युटीएस अ‍ॅपद्वारे रेल्वेला पाच महिन्यात दोन कोटींचा महसूल

तिकीट खिडकीवरील रांगेचा ताण मिटला : आठ लाख 59 हजार ऑनलाईन तिकीटांचे वितरण


भुसावळ : रेल्वेच्या तिकीट खिडकीवर वाढणारी प्रवाशांची गर्दी पाहता रेल्वेने एटीव्हीएम मशीनसह आता युटीएस (अनरीझर्व्ह तिकीट सिस्टीम) अ‍ॅपचा पर्याय पुढे केला आहे. वापरण्यास सहज व सुलभ असलेल्या या अ‍ॅपद्वारे जानेवारी 2024 ते मे 2024 अखेर रेल्वेला तब्बल दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून त्याद्वारे आठ लाख 59 हजार ऑनलाईन तिकीटांचे वितरण करण्यात आले आहे. या माध्यमातून तिकीट छपाईच्या खर्चात मोठी बचत झाली आहे.

प्रवाशांच्या वेळेत झाली बचत
रेल्वे तिकीट खिडकीवर प्रवाशांच्या वाढत्या रांगामुळे अनेकदा रेल्वे प्रवाशांची रेल्वेदेखील चुकते तर अनेकदा तिकीट हरवण्याचीदेखील भीती असते मात्र प्लेस्टोरवरून सहज डाऊनलोड होणार्‍या युटीएस अ‍ॅपमध्ये आवश्यक माहिती भरल्यानंतर डिजिटल माध्यमातून तिकीट सहज उपलब्ध असल्याने प्रवाशांचा तिकीट खिडकीवर उभे राहण्याचा ताण वाचतो शिवाय रेल्वेच्या कागदातदेखील मोठ्या प्रमाणावर बचत होत असल्याने रेल्वेच्या उत्पन्नात अधिकाधिक वाढ होत आहे.



भुसावळ विभागात जनजागृती
रेल्वे तिकीट खिडकीवर तिकीट काढण्यासाठी अनेकदा प्रवाशांची गर्दी होते त्यामुळे इच्छीतवेळी तिकीट घेण्यास उशीर होतो वा त्यावेळी रेल्वे निघून जाते त्यामुळे या सर्व त्रासापासून वाचण्यासाठी युटीएस अ‍ॅप उत्तम पर्याय आहे. अनारक्षित तिकीट काढताना रेल्वे प्रवाशांचा वेळ वाचावा आणि प्रवाशांना रांगेत उभे राहण्याच्या त्रासापासून दिलासा मिळावा यासाठी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य कर्मचार्‍यांद्वारे भुसावळ विभागातील विविध स्थानकांवर जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. वाणिज्य रेल्वे कर्मचार्‍यांनी युटीएस अ‍ॅप वापरण्यासाठी प्रोत्साहित केल्याने मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत एकूण आठ लाख 59 हजार प्रवासी तिकिटे यशस्वीरित्या जारी केली असून त्यातून एकूण दोन कोटी रुपयांचा महसूल विभागाला प्राप्त झाला आहे.

हार्डकॉपीची आवश्यकता नाही
भुसावळ विभागातील सर्व स्थानकांवर ऑनलाईन अनारक्षित रेल्वे तिकीट बुकिंगसाठी यूटीएस ऑन मोबाईल अ‍ॅप सुविधा उपलब्ध आहे. युटीएस ऑन मोबाइल अ‍ॅप लाँच करण्याचा उद्देश डिजिटल तिकीट मोडला प्रोत्साहन देणे, सेल्फ-तिकीटिंगला प्रोत्साहन देणे आणि प्रवाशांना रांगेचा त्रास न होता तिकीट खरेदी करता यावे हा उद्धेश आहे. यूटीएस मोबाइल अ‍ॅपमुळे प्रवाशांना पेपरलेस प्रवासाची तिकिटे, सीझन तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट थेट मोबाइल यूटीएस अ‍ॅपद्वारे मिळते व बुक केलेली तिकिटे अ‍ॅपमध्ये पाहिली जाऊ जातात व हार्डकॉपीची देखील आवश्यकता नाही त्यामुळे रेल्वेत कागदाचीदेखील मोठी बचत होत आहे.

अधिकाधिक प्रवाशांनी करावा अ‍ॅपचा वापर
डिजिटल तिकीट विक्रीला युटीएस अ‍ॅपद्वारे प्रोत्साहन मिळाले आहे. सेंट्रल रेल्वेने 660 विशेष हॉलीडे गाड्या चालवल्या व या गाड्यांमधील प्रवाशांनी डिजिटल तिकीटाला पसंती दर्शवत चांगले नागरिक होण्याचे कर्तव्य निभावले. या माध्यमातून रेल्वेच्या तिकीट खर्चातचही निश्चित बचत झाली असून तिकीटाच्या रांगेतील गर्दी कमी झाली आहे. वापरण्यास अत्यंत सुलभ असलेल्या युटीएस अ‍ॅपद्वारे डिजिटल तिकीट मोबाईलमध्ये असल्याने तिकीट हरवण्याची भीती नाही शिवाय त्यामुळे तिकीट खिडकीवर आता रांगेत उभे राहण्याची गरज नसल्याचे डीआरएम ईती पांडे ‘दैनिक तरुण भारत’शी बोलताना म्हणाल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !