विशेष सुरक्षा अभियान अंतर्गत रेल्वे गाड्यांची तपासणी
भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून जून 2024 पर्यंत विशेष सुरक्षा मोहिम राबविण्यात येत आहे. ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रवाशांना अग्नि सुरक्षा बद्दल महत्त्वाची जाणीव करून देणे आणि जनजागृती मोहिम राबवून आगीच्या घटनांचा धोका कमी करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांना गाड्यांमध्ये कोणतेही विस्फोट करणारे पदार्थ सोबत बाळगू नयेत. ट्रेनमध्ये प्रतिबंधित वस्तू न नेण्याबाबत स्थानकांवर सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीद्वारे घोषणा दिल्या जात आहेत.
रेल्वे गाड्याचीं काटेकोर तपासणी
मध्य रेल्वे भुसावळ विभागाकडून विभागातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर आणि विभागातून जाणार्या गाड्यांमध्ये विशेष सुरक्षा मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत वाणिज्य विभागाचे अधिकारी व संबंधित कर्मचार्यांनी पॅन्ट्री कारसह प्रवासी डब्यातील एलपीजी सिलिंडर, रॉकेलची स्टोव्ह आदी कोणत्याही प्रकारची स्फोटके व ज्वलनशील वस्तू तपासण्याचे तसेच प्रवाशांकडून ज्वलनशील वस्तूंवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. गर्दीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन रेल्वे गाड्या आणि स्थानकांवर अशी मोहीम राबविण्यात येत आहे.

