20 हजारांची लाच भोवली : येवला गटविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
Yevla group development officer in ACB’s net येवला : ठेकेदारा मार्फत झालेल्या विकासकामांचे बिल मंजूर करण्यासाठी चेकवर सही करून घेण्यासाठी मूल्यांकन बिलाच्या दोन टक्के प्रमाणे तडजोडीअंती 20 हजारांची लाच स्वीकारणार्या येवला गटविकास अधिकार्याला अहमदनगर एसीबीने अटक केली आहे. मच्छिंद्रनाथ देवव्रत धस (विठ्ठल नगर, येवला, रा.अहमदनगर) असे अटकेतील अधिकार्याचे नाव आहे. पाच आकडी पगाराची रक्कम घेणार्या अधिकार्याला अटक झाल्यानंतर पंचायत समितीतील लाचखोर हादरले आहेत.
असे आहे लाच प्रकरण
37 वर्षीय तक्रारदार यांचे ग्रामपंचायत हद्दीतील वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत 2022- 2023 करिता प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या ग्रामपंचायततील वस्ती वर ठेकेदार मार्फत झालेले विकास कामाचे बिल मंजूर करण्यासाठी चेकवर सही करून घेण्यासाठी मूल्यांकन बिलाच्या दोन टक्के प्रमाणे 20 हजारांची लाच गटविकास अधिकारी धस यांनी 3 रोजी मागितली होती. याबाबत तक्रार केल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली व 5 रोजी अधिकार्याने लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
नाशिक एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पोलीस निरीक्षक नीलिमा केशव डोळस, हवालदार गांगुर्डे, चालक पोलीस नाईक संदीप हांडगे, पोलीस शिपाई सुरेश चव्हाण आदींच्या पथकाने सापळा यशस्वी केला.
