गिरडगाव येथे घराबाहेरून म्हशीसह गाय लांबवली
यावल : यावल तालुक्यातील गिरडगाव येथे घराबाहेर बांधलेली गाय आणि म्हैस चोरट्यांनी लांबवली. शेतकर्याचे सुमारे 50 हजारांचे पशूधन चोरी गेल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गिरडगाव, ता.यावल येथील गुलशेर नजीर तडवी यांनी आपल्या घराबाहेर 20 हजार रुपये किंमतीची गाय आणि 30 हजार रुपये किंमतीची म्हैस बांधली होती. बुधवारी रात्री त्यांना या दोघा पशुधनास चारापाणी केले व ते घरात झोपले असता मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्याने 50 हजार रुपये किंमतीचे पशूधन चोरी केले. हा प्रकार गुरुवारी सकाळी निदर्शनास आला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुलशेर तळवी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश महाजन करीत आहे.
