नादुरुस्त ट्रकवर टँकर आदळल्याने वरणगावनजीक दोघा चालकांचा मृत्यू
वरणगाव : शहरालगत नवीन राष्ट्रीय महामार्गावर पहेलवान ढाब्याजवळ मुक्ताईनगर बाजूने नादुरुस्त झालेल्या ट्रकवर भरधाव वेगात मागील बाजूने टँकर आदळल्याने दोन्ही वाहनावरील चालकांचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला.
जागीच दोघा चालकांचा मृत्यू
गुरुवारी पहाटे भुसावळकडून मुक्ताईनगरकडे जाणारा ट्रक (क्रमांक सी.जी.04 जे.डी.0517) हा नादुरुस्त झाल्याने महामार्गावर उभा होता. नादुरुस्त झालेल्या ट्रकला पाहण्यासाठी चालक नदीम नसीम खान (नागपूर) हा ट्रक खाली जाऊन बघत असताना मागच्या बाजूने बारा चाकी टँकर (क्रमांक एम.एच. 41 ए.यु. 4646) वरील चालक कुंभकरण (रा.अमेठी उत्तरप्रदेश) याने मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. या धडकेत टँकरचा कॅबीनचा चुराडा झाला असून यामध्ये चालक कुंभकरण अडकला होता तर ट्रक खाली असलेला नदीम नसीम खान हा देखील ट्रक खाली दाबला गेला. दोघांना बाहेर काढून वरणगाव ग्रामीण रुग्णालयत दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुकराम सावकारे यांच्या फिर्यादीवरून टँकर चालक कुंभकरण याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

