बोदवड पोलिसांची मोठी कामगिरी : चोरीच्या 34 दुचाकी जप्त
भुसावळसह वरणगाव चोरट्याला अटक : पोलीस अधीक्षकांकडून पथकाचा गौरव
Big achievement of Bodwad police : 34 stolen bikes seized बोदवड : बोदवड पोलिसांनी दुचाकी चोरीच्या सत्रानंतर गोपनीय माहितीच्या आधारे भुसावळसह वरणगाव चोरट्याला बेड्या ठोकत त्यांच्याकडून तब्बल 34 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. या कौतुकास्पद कामगिरीची दखल घेत जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी बोदवड पोलीस ठाण्याला भेट देत अधिकारी व कर्मचार्यांचे कौतुक करीत त्यांचा सत्कार केला. यावेळी प्रसिद्धी माध्यमांना याबाबत माहितीही दिली. जितेंद्र उर्फ दगडू नारायण सोनवणे (31, वरणगाव, ह.मु.न्यु हुडको कॉलनी, भुसावळ) व रुपेश ज्ञानेश्वर चौधरी (26, सिध्देश्वर नगर, वरणगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
या शहरातून चोरी केल्या दुचाकी
अट्टल चोरट्यांनी बोदवड, वरणगाव, मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद हद्दीतून चोरी केल्याची कबुली दिली आहे. जप्त करण्यात आलेल्या 34 दुचाकींचे बाजारमूल्य तब्बल 17 लाख रुपये आहे. सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी बोदवड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांसह कारवाई करणार्या अधिकारी व कर्मचार्यांचा सत्कार केला.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे, बोदवड पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, सहा.पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुधाकर शेजोळे, पोलीस हवालदार रवींद्र गुरचळ, शशिकांत शिंदे, शशिकांत महाले, भूषण सोनवणे यांच्या पथकाने केली.
