खिर्डीतील मलक समीरची जळगाव पोलीस दलात निवड
गावातून पहिलाच पोलीस होण्याचा मिळवला मान
खिर्डी : पोलीस दलात रूजू होवून देशसेवा करण्यासाठी धडपड करणार्या खिर्डीतील मलक समीरचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. जळगाव पोलीस दलात त्याची निवड झाली असून गावातून प्रथम पोलीस होण्याचा मानही त्याने मिळवला आहे. जिल्हा पोलीस दलातील निवड प्रक्रिया होवून 10 जुलै रोजी रात्री निवड यादी जाहीर करण्यात आली. त्यात खिर्डी येथील मलक समीर मलक नसीर याला आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील शारिरीक व लेखी चाचणीत 150 पैकी 134 गुण मिळाले तो जिल्ह्यात आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातून प्रथम आला. गावासह परिसरातून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.
बुद्धविहारात केला अभ्यास
मलक समीर व खिर्डी येथून बहुतेक तरुण हे खिर्डी बुद्रुक येथील बुद्ध विहारात विहारात अभ्यास करीत होते. डॉ.बाबासाहेबांनी शिक्षणाला दिलेले प्राधान्य लक्षात येता या तरुणांनी अभ्यास केला व अपार मेहनत घेतल्याने त्याला यश मिळाले.

पहिला पोलीस होण्याचा मान
खिर्डी गावातील तरुण आर्मी, एस.आर.पी.एफ, आससम रायफल, बी.एस.एफ आदी सैन्य दलातील विविध शाखांमध्ये भरती होवून मातृभूमीची सेवा बजावत आहेत मात्र आतापर्यंत पोलीस भरतीत कुणाची निवड झाली नव्हती मात्र मलक समीर त्यास अपवाद ठरला आहे. अनेक वर्षापासून लेखी तसेच शारीरिक चाचणीचे सराव कोणताही क्लास न लावता केला व त्यात त्याला यशही मिळाले आहे.
देशसेवेचे स्वप्न साकार झाले
पोलीस भरतीत निवडीसाठी शारीरिक व लेखी परीक्षेच्या दृष्टीकोनाने सक्षम होण्याकरिता अभ्यासावर भर दिला. पोलीस भरतीत आपल्या पूर्ण तयारीने लेखी व शारिरीक चाचणीत उत्तीर्ण होऊ, असा आम्हाला विश्वास होता म्हणून मी हे करू शकलो. मातृभूमीची सेवा करण्याची संधी मिळाल्याचा सार्थ अभिमान असल्याचे मलक समीर म्हणाला.
