जय गणेश फाउंडेशन कलाकार, मानवतेचा संदेश देणारी कार्यशाळा
प्राचार्य सतीश कुलकर्णींच्या गौरव सोहळ्यात मान्यवरांचा सूर
भुसावळ (18 ऑगस्ट 2024) : शहरात कला, साहित्य, संस्कृती अशा नानाविध क्षेत्रात जय गणेश फाउंडेशनने वेगळा ठसा उमटवला आहे. कलाकार व मानवतेचा संदेश देणारी ही एक कार्यशाळा असल्याचे गौरवोदगार मान्यवरांनी काढले. निमित्त होते कार्यकारिणी निवड सभा व ज्येष्ठ नाट्यकर्मी प्राचार्य सतीश कुलकर्णी यांच्या गौरव सोहळ्याचे. सुरभी नगरातील नवसाचा गणपती मंदिरात गुरूवारी हा कार्यक्रम झाला.
यांची विचार मंचावर उपस्थिती
प्रमुख पाहुणे नाट्यलेखक विरेंद्र पाटील होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व दीपनगर वीज निर्मिती केंद्राचे निवृत्त मुख्य अभियंता आर.आर.बावस्कर होते. विचार मंचावर माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, समन्वयक गणेश फेगडे यांची उपस्थिती होती. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य सतीश कुलकर्णी यांच्या शैक्षणिक, नाटक, सामाजिक अशा विविध क्षेत्रांतील कार्याचा धांडोळा घेतलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सेंट्रल रेल्वे स्कूलचे निवृत्त शिक्षक राजेंद्र जावळे यांनी या पुस्तिकेचे संपादन केले आहे. दरम्यान या कार्यक्रमात फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र यावलकर यांची निवड जाहीर करण्यात आली.

