जळगावात साडेआठ लाखांची धाडसी घरफोडी : पाठलागाअंती एमपीतील चोरट्याला बेड्या
Daring house burglary worth eight and a half lakhs in Jalgaon : After the chase, the thief in MP is in shackles. जळगाव : बंद घरातून सुमारे आठ लाख 47 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला मात्र चोरटा दुचाकीने पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग करुन चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. शनिवार, 17 रोजी ही घटना महावीरनगरात घडली. सोमा मोतीसिंग अलावा (50, रा.नरवाली, ता.कुक्षी म.प्र.) असे आरोपीचे नाव आहे.
बंद घर साधली संधी मात्र काही तासात आवळल्या मुसक्या
ईश्वर गुणवंतराव खंदार हे महावीर नगरात वास्तव्यास आहेत. रक्षाबंधनानिमित्त शुक्रवार, 16 ऑगस्ट रोजी ते घराला कुलूप लावून खंदार परिवार, बडोदा येथे त्यांच्या बहिणीकडे गेले. बंद घर हेरत चोरट्यांनी कडीकोयंडा तोडत प्रवेश केला. लोखंडी कपाटातील सामान अस्ताव्यस्त करत चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोकड मिळून 8 लाख 47 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. पसार होण्यासाठी चोरट्यांनी खंदार यांच्या भावाची दुचाकी चोरली मात्र पोलिसांनी पाठलाग करत संशयित सोमा अलवा याला ताब्यात घेतले. मात्र त्याचे तीन साथीदार रवी नवलसिंग अलावा (22), राकेश कुवँरसिंग अलावा (32) तसेच भारत छगन अलावा (22) हे पसार झाले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हे उघडकीस येणार
सोमा अलावा याला रविवार, 18 रोजी न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या चौकडीने अन्य शहरातही धाडसी चोरी केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. तिघा चोरट्यांच्या शोधार्थ पथक रवाना करण्यात आले आहे.
