धावताना आयुष्याचा प्रत्येक क्षण उत्सवाप्रमाणे साजरा करायला शिका ः आशिष कासोदेकर
भुसावळ (19 ऑगस्ट 2024) : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक विशिष्ट ध्येय असते, ते साध्य करताना येणार्या अडचणींचा विचार न करता प्रयत्न करत राहिल्यास यश नक्कीच मिळते. रनिंगच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यापूर्वी हा विचार मी नेहमी करतो व त्यानुसार प्रयत्न करतो, त्यामुळेच लद्दाख येथील 111 किमी, 333 किमी व 555 किमी या आव्हानात्मक स्पर्धांमध्ये मी यशस्वी झालो, त्याशिवाय धावण्यापूर्वी व धावताना प्रत्येक वेळी मी माझी धाव संवेदनशीलतेशी जोडल्यामुळे प्रत्येक क्षण मी उत्सवाप्रमाणे साजरा करू शकलो, असे प्रतिपादन जगप्रसिद्ध गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड धारक धावपटू आशिष कासोदेकर यांनी केले. भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशन आयोजित प्रकट मुलाखती दरम्यान ते बोलत होते.
प्रत्येक मॅरेथॉन आपल्याला काहीतरी शिकविते
असोसिएशनतर्फे प्रविण पाटील यांनी आशिष यांना विविध विषयांवर बोलते करण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. प्रविण फालक होते. आशिष यांनी उपस्थित धावपटू व सायकलपटूंना मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रत्येक मॅरेथॉन आपल्याला काहीतरी शिकवित असते. यावेळी त्यांनी सहभाग घेतलेल्या ब्राझील येथील 217 किमी व अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील बॅड वॉटर मॅरेथॉनमध्ये आलेले अनुभव कथन केले. त्याशिवाय पुणे विद्यापीठाच्या परिसरात सतत 60 दिवस 42 किमी धावताना विविध क्षेत्रातील व विभागातील धावपटू कसे जोडले गेले व त्या 60 मॅरेथॉनची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर 76 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी देशातील समुद्रसपाटीपासून सर्वात खाली असलेले केरळ येथील कुन्नूर ते सर्वात उंच ठिकाण लद्दाखला पोहोचताना तब्बल चार हजार किमीपेक्षा जास्त अंतर सतत 76 दिवस धावतानाचे त्यांचे अनुभव सांगितले.

प्रा.प्रवीण फालक यांनी आशिष कासोदेकर यांचे स्वागत व सत्कार केला. डॉ.तुषार पाटील यांनी आशिष कासोदेकर यांचा परिचय करून दिला. यावेळी जळगाव येथील धावपटू गुरुप्रसाद तोतला यांनी सह्याद्री अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये 100 किमी धावल्याबद्दल आशिष कासोदेकर यांनी त्यांचा सहकुटुंब सत्कार केला. आभार प्रदर्शन प्रवीण पाटील यांनी केले. प्रमोद शुक्ला, डॉ.चारुलता पाटील, छोटू गवळी, डॉ.वर्षा वाडिले, स्वाती फालक आदींनी सहकार्य केले.
