भुसावळ ते फैजपूर कावड यात्रा जल्लोषात
फैजपूर (20 ऑगस्ट 2024) : तारखेश्वर धाम ते फैजपूर कावड यात्रा नुकतीच भुसावळच्या तापी नदीवरून रामप्रहरी भक्तीमय वातावरणात काढण्यात आली. पाडळसा, बामणोद, आमोदा, पिपंरुड फाटा मार्गे फैजपूर शहरात दुपारी 1.30 वाजता ढोल ताशा, डीजेच्या गजरात कावड यात्रेचे आगमन झाल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा भाविकांचा जनसागर उसळला होता. शहरात कावड यात्रा मुख्य मार्गाने मार्गस्थ होत खंडोबा देवस्थान, खंडेश्वर महादेव मंदिर येथे आल्यानंतर तिचा समारोप झाला.
तापी नदीच्या पवित्र जलाने वेदोपचारात पुरोहितांद्वारे महाअभिषेक पूजा झाली. नंतर भजन संगीत व सामूहिक महा प्रसादी भोजनचा आस्वाद भाविकांनी घेतला. कावड यात्रेत भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, डॉ.कुंदन फेगडे आदींनी सहभाग नोंदवत संत दर्शन घेतले. यात्रेत पवनदास महाराज, राममनोहरदास महाराज, हभप प्रवीणदास महाराज या संतांसह भाविक सहभागी झाले.

