कोल्हापूर हादरले : दहा वर्षीय अल्पवयीन मुलीची अत्याचारानंतर हत्या
Kolhapur shaken : Ten-year-old minor girl killed after torture कोल्हापूर (22 ऑगस्ट 2024) : राज्यात बदलापूरसह अकोला येथील घटनांमुळे समाजात संतापाची लाट असताना कोल्हापूरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अवघ्या दहा वर्षीय बालिकेची अत्याचारानंतर निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मयत बालिका बुधवारी बेपत्ता झाल्यानंतर गुरुवारी गावालगतच्या शेतात तिचा मृतदेह आढळला.
हत्येपूर्वी अत्याचाराचा संशय
पीडित 10 वर्षीय बालिका बुधवारी बेपत्ता असताना गुरुवारी सकाळी गावालगतच्या एका शेतात तिचा मृतदेह आढळला. पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या मुलीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थितीचा आढावा घेतला. त्यांनी पोलिसांना या घटनेचा वेगवान तपास करण्याचे निर्देश दिलेत.

स्थलांतरीत मजुर कुटूंबातील बालिका
शिरोली एमआयडीसी हद्दीतील रामनगरात तीन वर्षांपूर्वी बिहारमधून स्थलांतरित झालेल्या कुटूंबातील दाम्पत्यास तीन मुली व दोन मुले आहेत. सायंकाळी कामावरून घरी परतल्यानंतर त्यांना आपली मुलगी दिसली नाही. त्यांनी तिचा शोध घेतला पण तिचा थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर बुधवारी रात्री उशिरा त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
