कडगाव-जोगलखेडा रस्त्यावरील पुलाच्या खड्ड्यात बुडाल्याने शेतकर्‍याचा बुडून मृत्यू


A farmer drowned due to drowning in the bridge pit on Kadgaon-Jogalkheda road जळगाव (28 ऑगस्ट 2024) : कडगाव-जोगलखेडा रस्त्यावरील पुलाच्या बांधकामासाठी केलेल्या खड्ड्यात बुडून एका शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडली. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हे काम अपूर्ण राहिल्याने ही घटना घडल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. जोपर्यंत ठेकेदारावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्र नातेवाईकांनी घेतला आहे. यासंदर्भात नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. संतोष यादव धनगर (55, रा.कडगाव, ता.जळगाव) असे मयताचे नाव आहे.

पाण्यात बुडाल्याने मृत्यू
जळगाव तालुक्यातील कडगाव येथे संतोष धनगर हे शेतकरी आपल्या पत्नी आणि मुलासह वास्तव्याला होते. शेतीकाम व पशू पालन करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे मंगळवार, 27 ऑगस्ट रोजी दुपारी ते म्हशी चारण्यासाठी गेले असता सायंकाळी परत येत असताना जोगलखेडा ते कडगाव रस्त्यावरील पुलाच्या खड्ड्यात त्यांच्या म्हशी गेल्या होत्या. पाण्यात गेलेल्या म्हशी या गाळात बसल्याने त्यांना काढण्यासाठी संतोष धनगर हे गेले असता, त्यांच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.

ठेकेदाराविरोधात रोष
या रस्त्याने गावातील ग्रामस्थ ये-जा करत असताना ही घटना त्यांच्या लक्षात आल्याने गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन संतोष धनगर यांना खड्ड्यातील पाण्यातून बाहेर काढले. यावेळी संबंधित ठेकेदाराने हे काम अपूर्ण ठेवल्यामुळे संताप व्यक्त झाला. जोपर्यंत संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा नातेवाईक व ग्रामस्थांनी घेतला होता. दरम्यान रात्री 11 वाजता मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !