जळगावात भीषण अपघात : भरधाव ट्रकने चिरडल्याने तरुणीसह महिलेचा मृत्यू
अपघातात चिमुकला गंभीर जखमी : नातेवाईकांचा मन हेलावणारा आक्रोश
Terrible accident in Jalgaon : A young woman and a woman died after being crushed by a speeding truck जळगाव (28 ऑगस्ट 2024) : भरधाव ट्रकने दुचाकीला मागून दिलेल्या धडकेने झालेल्या अपघातात विवाहितेसह 17 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला तर चिमुकला बचवला. हा भीषण अपघात जळगावच्या घटना मानराज पार्कसमोरील महामार्गावर बुधवार, 28 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान, या अपघातात महिलेसोबतचा तीन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. पायल उर्फ खुशी देवेंद्र जलंकर (17) व दीक्षिता राहुल पाटील (27, दोन्ही रा.द्वारकाई अपार्टमेंट, वाटिकाश्रम जळगाव) अशी मयतांची नावे आहेत.
मुलाला पाहण्यासाठी जाताना अपघात
जळगाव शहरातील वाटिकाश्रम येथील द्वारकाई अपार्टमेंट येथे पायल जलंकर ही मुलगी परिवारासह वास्तव्याला होत्या व याच अपार्टमेंटमध्ये दिक्षिता पाटील ही विवाहिता माहेरी आली होती. अपार्टमेंटमधील रहिवासी निलेश पाटील यांना मुलगा झाल्याने त्यास पाहण्यासाठी दीक्षिता पाटील या विवाहिता आपल्या तीन वर्षाच्या मुलगा रूद्रा आणि पायल जलंकर यांच्यासोबत बुधवारी 28 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता दुचाकी (एम.एच.18 ए.एस.5379) ने हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघाल्या होत्या. खोटे नगरकडून जळगाव शहरातकडे दुचाकीने जात असतांना मानराज पार्कजवळील पुलाच्या उतरतीवर मागून भरधाव वेगाने येणार्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक देवून दोघांना चिरडले. या अपघात दिक्षिता आणि पायल या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेला रूद्र हा गंभीर जखमी झाला. ही घटना नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली.

जिल्हा पेठ पोलिसांची धाव
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. दोघांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. या घटनेबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
