हाथी घोडा पालखी, जय कन्हैय्या लाल की…!

श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात : भुसावळ विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन


भुसावळ (29 ऑगस्ट 2024) : भुसावळसह विभागातील विविध गावांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. उंचच उंच थर लावण्यात आले. शाळा, महाविद्यालयांमध्ये चिमुकल्यांनी श्रीकृष्णाची भूमिका वठवली. दहिहंडी फोडणार्‍या मंडळांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.

पुं.ग.बर्‍हाटे विद्यालयात स्पर्धेचे आयोजन
भुसावळ : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व खेलोभारत भुसावळ शाखेतर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त ‘राधा राणी’ हंडीफोड प्रतियोगिता व दहिहंडी उत्सवाचे आयोजन पुंडलिक गणपत बर्‍हाटे विद्यालयात करण्यात आले. खेलोभारत प्रांत संयोजक तुषार जाधव, अभाविप शहराध्यक्ष प्रा.स्मिता बेंडाळे, शहरमंत्री वैष्णवी कोळी, ज्ञाती नारखेडे, सहप्रमुख नयना ठाकुर व अभाविप कार्यकर्ते उपस्थित होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे शहरात पहिल्यांदा महिलांसाठी हंडी फोड स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थी परिषद महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवेल, असे शहर सहमंत्री गायत्री पाटील म्हणाल्या.

यावल शहरात श्री कृष्ण जन्मोत्सव उत्साहात
यावल : शहरातील सातोद रस्त्यावरील पेठेच्या श्रीराम मंदिरात सोमवारी रात्री एका कार्यक्रमाचे आयोजन करीत श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. मध्यरात्री 12 वाजेला श्रीकृष्ण जन्म कार्यक्रमानंतर भाविक-भक्तांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. सायंकाळपासून मंदिरात भजन, कीर्तन सुरू होते. मंदिरात रात्री 12 वाजता मंदिराचे पुजारी पप्पू महाराज जोशी यांनी आरती करीत श्री कृष्ण जन्मोसव साजरा केला. मंदिरात रामदेव बाबा भजनी मंडळ, कालभैरव भजनी मंडळ, भोले बाबा भजनी मंडळ यांनी भजने सादर केली.

श्री क्षेत्र मनुदेवी मंदिरात उत्साहात फोडली दहिहंडी
यावल : यावल तालुक्यातील आडगावपासून सातपुड्याच्या कुशीत असलेल्या श्री क्षेत्र सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिरात मंगळवारी गोपाळ काल्यानिमित्ताने दहिहंडीचा कार्यक्रम झाला. मनुदेवी येथील व्यवसायीक विश्वदीप सुरेश पाटील, किरण कोळी, संयोजक योगेश पाटील, चेतन पाटील, निलेश पाटील यांच्या पुढाकाराने येथे हा कार्यक्रम झाला. सकाळी अकरा वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्व दुकानदारांनी व संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दिली. दहीहंडी फोडण्याचा मान साईराज शशिकांत कोळी याला देण्यात आला. पारंपरिक पध्दतीने दहिहंडी फोडण्यात आली. यशस्वीतेकरीता नरेंद्र पाटील, दीपक कोळी, जालम पाटील, वामन पाटील, प्रशांत पाटील, समाधान कोळीसह सर्व दुकानदारांनी परिश्रम घेतले.

मोठे वाघोदे येथे बाल-गोपालांनी फोडली दहिहंडी
मोठे वाघोदे : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गावात भगवान श्रीकृष्ण यांच्या मूर्तीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. श्रीकृष्ण मंदिर येथून बॅण्ड पथक व ढोल-ताशांच्या गजरात प.पू.दिवाकरबाबा शास्त्री यांच्याहस्ते पूजन होऊन पालखी मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. यावेळी मिरवणूक मार्गातील बसस्थानक परिसर, सात बाजार, पाटीलपुरी, पाटीलवाडा आदी ठिकाणी बाल-गोपाळांकडून दहिहंडी फोडण्यात आली. मिरवणूक शांततेत पार पाडावी यासाठी सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल पाटील उपस्थित होते.

श्री.र.न.मेहता विद्यामंदिर
भुसावळ : हिंदी सेवा मंडल संचलित श्री.र.नं.मेहता विद्या मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. चित्रकला, मुकुट सजावट, मटकी सजावट, गीत गायन (कृष्ण भजन) राधाकृष्ण युगल संवाद, राधाकृष्ण वेशभूषा, रास गरबा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. चित्रकला स्पर्धेमध्ये भगवान राधाकृष्ण यांच्या जीवनावर आधारित चित्रांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे रंगकाम केले. मुकुट सजावटमध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय मनमोहक भगवान श्रीकृष्णाचा मुकुट विविध साहित्याचा वापर करून तयार केला. भगवान श्री कृष्ण जन्माष्टमी प्रसंगी विद्यार्थ्यांनी राधाकृष्ण यांची वेशभूषा धारण केली होती. विद्यार्थ्यांनी याप्रसंगी गरबा यामध्ये सहभाग घेऊन श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा आनंद साजरा केला. विद्यालयाच्या प्रधानाध्यापिका रिता शर्मा व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

सावदा शहरात जन्माष्टमी उत्साहात
सावदा : शहर व परिसरातील सर्व श्रीकृष्ण मंदिरात सोमवारी श्रीकृष्णाष्टमी साजरी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त मंदिरांवर रोषणाई करण्यात आली होती. स्वामीनारायण मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त सकाळी महापूजेचे आयोजन करण्यात आले. रात्री स्वामीनारायण धुन मंडळाने रात्री 10 ते 12 पर्यंत सुंदर भजने सादर केली रात्री 12 वा जन्माष्टमी साजरी करण्यात आली. नंतर प्रसाद वाटप करण्यात आला यावेळी कोठारी शास्त्री स्वयंमप्रकाशदासजी व मंडळाने कार्यक्रमाचे व महापूजेचे हे आयोजन केले होते तर दर्शनासाठी मंदिरात भाविकांनी देखील मोठी गर्दी केली होती. सावदा येथील महानुभाव मठ श्रीकृष्ण मंदिरात आठवडाभरा आधीच जन्मोत्सवाची जोरदार तयारी सुरू होती. सोमवारी रात्री 7 वाजेपासून भजनसंध्या, प्रवचन व रात्री 12 वाजता महाआरती होऊन श्रीकृष्ण जन्म साजरा झाला. मंगळवारी देखील धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सावदा शहरातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. मंदिराचे विश्वस्त आचार्य सुरेशराज शास्त्री मानेकर यांनी सर्व कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यांच्याहस्ते महापूजा व आरती करण्यात आली. विठ्ठल मंदिरात देखील सुंदर आरास करण्यात आली. रात्री भजने झाली व त्यानंतर श्रीकृष्ण जन्म उत्साहात साजरा करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !