भुसावळात रेल्वे सुरक्षा बलाची सतर्कता : एक लाख 70 हजारांचा गांजा जप्त

संशयीत मात्र बॅगा सोडून पसार  : अज्ञाताविरोधात लोहमार्ग पोलिसात गुन्हा


भुसावळ (30 ऑगस्ट 2024)  भुसावळातील सतर्क रेल्वे सुरक्षा बलाला दोन तरुणांकडे असलेल्या बॅगांबाबत संशय आल्यानंतर त्यांनी बॅगा तपासणीचे आदेश दिले मात्र मशीनमध्ये बॅगांची तपासणी करण्यात यंत्रणेचे कर्मचारी व्यस्त असताना काही कळण्याआत 25 वयोगटातील दोन तरुण बॅगा सोडून पसार झाले. सुरक्षा यंत्रणेने सावधगिरीने बॅगांची तपासणी केली असता त्यात एक लाख 70 हजार रुपये किंमतीचा 17 किलो गांजा सापडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. ही घटना गुरुवार, 29 रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात दोघांविरोधात लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बॅगांची तपासणी होताना तरुण पसार
रेल्वेच्या दर्शनी भागातील दक्षिण बाजूला मुसाफिर खान्याजवळ लगेच स्कॅनर मशीन लावण्यात आले असून अहोरात्र सुरक्षा बलाकडून प्रवाशांवर नजर ठेवली जाते तसेच त्यांच्याकडील सामानाची मशीनमध्ये तपासणी केल्यानंतर त्यांना स्थानकात सोडले जाते. बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक पी.आर.मीना यांच्या मार्गदर्शनाखाली एमएसएफ जवान वसंत बाविस्कर व रेल्वे सुरक्षा बलाचे हवालदार नेरपगार हे कर्तव्यावर असताना 25 वयोगटातील दोन तरुण ट्रॉली बॅगसह कॉफी कलरची बॅग घेवून स्थानकात येताना दिसले मात्र तरुणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांना कर्मचार्‍यांनी बॅगा स्कॅनरमध्ये तपासणीचे सूचित केले. दोघा तरुणांनी स्कॅनरमध्ये बॅगा टाकल्यानंतर कर्मचारी तपासणी करीत असताना संशयीत मात्र अलगदरित्या निसटले.

एक लाख 70 हजारांचा गांजा जप्त
दोघा कर्मचार्‍यांनी हा प्रकार स्थानक निरीक्षक पी.आर.मीना व सुरक्षा बलाचे एएससी अशोक कुमार यांना कळवल्यानंतर यंत्रणेने धाव घेत बॅगांची तपासणी केली असता एका बॅगेत चार तर दुसर्‍या बॅगेत पाच पार्सल आढळले. पार्सल उघडल्यानंतर पॉलिथीन आत गांजा आढळल्याने लोहमार्ग प्रशासनाला सूचित करण्यात आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत शासकीय सोपस्कार पूर्ण केल्यानंतर गांजाची मोजणी केली असता एकूण 17 किलो गांजा आढळला. त्याचे बाजारमूल्य एक लाख 70 हजार रुपये इतके आहे. या प्रकरणी आरपीएफ निरीक्षक आर.के.मीना यांच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण निकाळजे करीत आहेत.

संशयीतांचा लोहमार्ग पोलिसांकडून कसून शोध
लोहमार्ग पोलीस निरीक्षक सुधीर जंजाळकर म्हणाले की, संशयीत ज्या भागातून पसार झाले तसेच रेल्वेच्या आत येणार्‍या व जाणार्‍या सर्व मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजवरून संशयीतांचा माग काढण्यात येत आहे. लवकरच संशयीतांना अटक करण्यात आम्हाला यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !