माय-लेकींच्या धाडसाला सलाम ! : छेड काढणार्या टवाळखोरांना चोपले
नाशिक (30 ऑगस्ट 2024) : राज्यात महिलांसह तरुणींवर अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने समाजमन संतप्त झाले असताना नाशिकच्या शिवशक्ती चौकाजवळील डॉ. हेडगेवार चौकात माय-लेकींनी हिंमत दाखवत छेड काढणार्या टवाळखोरांना झोडपून काढले आहे. नाशिककर महिलांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे तर दुसरीकडे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करीत चार संशयीतांना अटक केली आहे.
रूद्रावतार पाहताच टवाळखोरांनी ठोकली धूम
पवननगर भागातील महिला हेडगेवार चौकातील मनपा रुग्णालयात येत असताना रस्त्यालगत बाकावर बसलेल्या टवाळखोरांनी या महिलेची छेड काढली. महिलेने सुरुवातीला दुर्लक्ष केले. मात्र, पुन्हा हा प्रकार घडल्याने तिचा संताप अनावर झाला. तिने मागे फिरून टवाळाला विचारणा केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. इतक्यात या महिलेची मुलगी व मैत्रीण पाठीमागून दुचाकीवर आल्या. टवाळखोर हे आईची छेड काढत असल्याचे पाहून लेकीने थेट टवाळखोराच्या कानशिलात लगावली. बाजूला जात असलेल्या भंगारच्या गाडीवरून खुर्ची उचलून टवाळखोराला चोपून काढले. रणरागिणींचा रुद्रावतार पाहून टवाळांनी तेथून पळ काढला.

