चिंचोली गावात अन्न औषध अधिकारी असल्याची बतावणी करून 50 हजाराची खंडणी उकळली : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Extortion of 50,000 by pretending to be Food and Drug Officer in Chincholi village : Case registered against two यावल (1 सप्टेंबर 2024) : यावल तालुक्यातील चिंचोली गावातील भवानी पेठमध्ये असलेल्या दुकानदाराकडे दोघांनी आम्ही अन्न औषध खात्याचे अधिकारी असल्याचे सांगून तुम्ही विमल गुटखा विकतात, असे आम्हाला समजले आहे. तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल. तुम्हाला तुमच्या पत्नीला व मुलाला अटक केली जाईल, असे सांगून त्यांच्याकडून 50 हजाराची खंडणी दोघांनी घेतली. जुलै महिन्यानंतर पुन्हा या दोघांनी शुक्रवारी दुकानदाराकडे जाऊन खंडणीची मागणी केली. दुकानदाराला संशय आला व त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांच्या पथकाने गावात जाऊन दोघांना ताब्यात घेतले आहे व त्यांच्या विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघा संशयीतांना घेतले ताब्यात
चिंचोली, ता.यावल गावातील भवानी पेठमध्ये संतोष हरी बडगुजर यांचे किराणा दुकान आहे. त्यांच्या दुकानात 7 जुलै रोजी आकाश भगवान जावरे (29, रा.आंबेडकर चौक, नंदुरबार) व राहुल श्रीहरी काळे (43, रा.कात्रज, पुणे) हे दोघे आले. आम्ही अन्न,औषध खात्याचे अधिकारी आहोत तुम्ही विमल गुटखा विकतात म्हणून तुमच्याविरुद्ध कारवाई करायची आहे. तुमची पत्नी आणि मुलगा यांना अटक करायची आहे. असे सांगून त्यांना दम दिला. तुम्हाला अटक टाळायची असेल तर दोन लाख रूपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. संबंधित दुकानदाराने त्यांना 50 हजार रुपये दिले आणि ते तिथून निघून गेले. त्यानंतर दोघे शुक्रवार, 30 ऑगस्ट रोजी गावात आले आणि त्यांनी परत दुकानदाराकडे पैशांची मागणी केली मात्र दुकानदाराकडे गुटखा नव्हता म्हणुन त्याने गावातील होमगार्ड संजय साळुंखे यांना माहिती दिली. यावल पोलिसांना बोलवण्यात आले.

फसवणुकीचा गुन्हा दाखल
घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, सहायक फौजदार असलम खान, हवालदार वासुदेव मराठे, जाकिर तडवी, राहुल अहिरे हे पथकासह दाखल झाले व त्यांनी दोघांना ताब्यात घेतले व यावल पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दुकानदार संतोष बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.
