भुसावळातील देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात सीडबॉल प्रशिक्षण
भुसावळ (1 सप्टेंबर 2024) : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात वनस्पती शास्त्र विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी बीज गोळे (सीड बॉल) निर्मिती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य प्राचार्य डॉ.आर.पी.फालक होते.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
प्रशिक्षक म्हणून वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.माधुरी पाटील उपस्थित होत्या. प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी बीज गोळे अर्थात सीड बॉल्स ही पर्यावरण पूरक पद्धती असून ती वनीकरण आणि हरित क्षेत्र वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. या पद्धतीत कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत वापरले जात नाही उलट माती, शेणखत आणि वनस्पतीच्या विविध बिजांपासून बिजगोळे तयार केले जातात. हे गोळे कोठल्याही जमिनीत फेकल्यावर योग्य परिस्थिती निर्माण झाली म्हणजे बीज अंकुरण्यास सुरुवात होते. प्रा.डॉ.माधुरी पाटील आणि प्रा.श्रेया चौधरी चौधरी यांनी उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना सीड बॉल निर्मितीचे प्रशिक्षण दिले. प्रास्ताविक प्रा.निर्मला वानखेडे यांनी तर आभार प्रा.डॉ.जयश्री सरोदे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.धनश्री नेहेते, प्रा.कामिनी चौधरी, प्रकाश चौधरी यांनी सहकार्य केल्याचे प्रसिध्दी प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी कळवतात.

