पर्यावरणपूरक गणेशोत्सव : भुसावळातील कार्यशाळेत आठशे विद्यार्थ्यांचा सहभाग

प्रतिष्ठा महिला मंडळ, सोनिच्छा ड्रॉईंग क्लास, रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी व इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीचा उपक्रम


भुसावळ (1 सप्टेंबर 2024) : पीओपी मूर्तीमुळे होणारे प्रदूषण पाहता शाडू मातीपासून तयार केलेल्या मूर्ती बनवून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळ, सोनिच्छा ड्रॉईंग क्लास, रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी व इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 1 सप्टेंबर रोजी शहरातील संतोषी माता सभागृहात एक दिवसीय मोफत मूर्ती प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत शहरातील आठशेवर चिमुकल्यांनी आपला सहभाग नोंदवत बाप्पांच्या एक हून एक सरस मूर्ती साकारल्या. खिरोदा येथील सप्तपुट ललितकला भवनाचे प्राचार्य व शिल्पकार अतुल मंगेश मालखेडे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्याविषयी मार्गदर्शन केले.

परिवर्तनाची सुरूवात स्वतःपासून करा : आमदार संजय सावकारे
भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते मूर्ती प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी आमदार मार्गदर्शनात म्हणाले की, गणेशोत्सवामधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण यासाठी गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा होणे ही काळाची गरज आहे. सर्वांनी त्यासाठी आग्रही असावे व आपला दृष्टिकोन पर्यावरणस्नेही ठेवला तरच उत्सव साजरे करण्याबाबत सामाजिक परिवर्तन होऊ शकेल. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तसेच मोठ्या आकाराच्या मूर्तींमुळे विसर्जनाच्यावेळी होणारे पाण्याचे प्रदूषण जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण करणारे असते त्यामुळे त्याचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. शाडू मातीपासून बनवलेल्या मूर्ती पर्यावरण पूरक असल्याचे आमदार यावेळी म्हणाले.

स्वतःच रेखाटलेली मूर्ती पाहून विद्यार्थीही थक्क
पर्यावरण पूरक मूर्ती कार्यशाळेसाठी शहरातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. त्यात रविवारी असलेली कार्यशाळा व दप्तराला सुटी असल्याने (शाळेला) विद्यार्थ्यांनी घरूनच नास्ता, पाणी, न्यूज पेपर, छोटा मग, नॅपकीन तसेच मूर्ती ठेवण्यासाठी पुस्टा आदी साहित्य सोबत आणले होते तर मूर्ती बनवण्यासाठी लागणारे अन्य साहित्य आयोजक आमदार संजय सावकारे यांच्यातर्फे प्रशिक्षणस्थळी देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी अत्यंत सुबक पद्धत्तीने गणपती बाप्पांच्या मूर्ती रेखाटल्या व या मूर्ती पाहून विद्यार्थीही थक्क झाले. खिरोद्यातील सप्तपुट ललितकला भवनाचे प्राचार्य व शिल्पकार अतुल मंगेश मालखेडे यांनी अत्यंत सोप्या पद्धत्तीने शाडू मातीपासून मूर्ती बनवण्याची पद्धत सांगत विद्यार्थ्यांकडून यावेळी बाप्पांच्या मनमोक मूर्ती बनवून घेतल्या. पर्यावरणपूरक मूर्तीचे फायदेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यशाळेसाठी साधारण 18 बॅग मातीचा (450 किलो) वापर करण्यात आला.

यांची कार्यशाळेला उपस्थिती
कार्यशाळेसाठी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, सचिव लता सोनवणे, सोनिच्छा ड्रॉईंग क्लासच्या जयश्री चौधरी, रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीचे अध्यक्ष विशाल शाह, सचिव अनिल सहानी, इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी अध्यक्षा मीनाक्षी धांडे, सचिव किरण जावळे, कला शिक्षक ज्योती राठोड आदींची उपस्थिती होती. कार्यशाळा यशस्वीतेसाठी वरुण इंगळे, अनिता आंबेकर, वर्षा लोखंडे, पुरूषोत्तम पटेल, सुनीता पाचपांडे, वैशाली सैतवाल, वैशाली भगत, राजश्री बादशाह, वैशाली महाजन,प्रिती पाटील व सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले. भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या सौजन्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

आठ मूर्तीकारांचा बक्षिसाने सन्मान
प्रशिक्षण कार्यशाळेत सुबक मूर्ती बनवणार्‍या अनिकेत जितेंद्र पाटील, कुशल नरेंद्र राणे, सोनाक्षी सुरेश पाटील, सम्यक गणेश इखारे, मेघ भूषण खाणे, दुर्गेश सुरेश पाटील, ईश्वरी व शर्वरी नयनकुमार महाजन या आठ मूर्तीकांराचा प्रमाणपत्र तसेच आकर्षक भेटवस्तू देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तर अन्य सहभागी आठशे सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !