अडावद येथे अज्ञातांकडून शेतमजूराचा निर्घृण खून !


Heinous murder of a farm laborer by unknown persons in Adavad ! चोपडा (2 सप्टेंबर 2024) : अडावद, ता.चोपडा येथे एका शेतमजुराचा निर्घूण खून करण्यात आल्याची बाब समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. अंकलेश्वर – बर्‍हाणपूर महामार्गावर असलेल्या पिर पाखर बाबाच्या दर्याजवळ रविवारी पहाटेच्या सुमारास एका शेत मजुराचा मृतदेह आढळला. जगदीश फिंगर्‍या बारेला (40), असे मयताचे नाव आहे.

अधिकार्‍यांची धाव
अंकलेश्वर-बर्‍हाणपूर महामार्गावर पीर पाखर बाबाच्या दर्यांजवळ जगदीश बारेला यांचा मृतदेह रविवारी आढळला होता. त्यांच्या शरीरावर जखमांचे निशाण दिसून आले. पोलिसांनी तत्काळ जळगाव येथील श्वान पथकाला पाचारण केले होते. जगदीश फिंगर्‍या बारेला हा गावाच्या उत्तरेकडील हतनूरच्या उजव्या कालव्यावरील डाव्या चारीवर झोपडीत राहत होता. संपूर्ण कुटुंब शेतमजुरी करन उदरनिर्वाह करीत होते. चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली.

खुनाचे कारण अस्पष्ट
अडावद पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलिस उपनिरीक्षक राजू थोरात यांनी पाहणी केली. मयताच्या डोक्यावर व अंगावर मारहाणीच्या खुना आहेत शिवाय गळ्याभोवती फास आवळल्याची निशाणी असल्याचे समजते. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी पोलिसांना (एम.पी.46 एम.एल.6889) या क्रमांकाची दुचाकी आढळली आहे. मृताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान, खून कोणी व का केला?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !