पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची निर्घूण हत्या
आधी झाडल्या पाच गोळ्या नंतर कोयत्यानेही केले वार
Former corporator of NCP in Pune Vanraj Andekar brutally murdered पुणे (2 सप्टेंबर 2024) पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पाच गोळ्या झाडून तसेच कोयत्याचे वार करून हत्या करण्यात आली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
सहा दुचाकीवरून आले हल्लेखोर
पुण्यातील नाना पेठेतील आंदेकर चौकात वनराज आंदेकर (Vanraj Andekar) चुलत भावासोबत थांबले असताना रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सहा दुचाकीवरून आलेल्या 13 जणांनी आंदेकर यांना घेरलं. सुरुवातीला त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात वनराज आंदेकर यांचा जागीच मृत्यू झाला. हा सर्व थरार जवळच असणार्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे.

दोन जणांना अटक
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांना जवळच असणार्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र रुग्णालयात नेण्यांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांची ओळख पटल्यानंतर त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी जयंत लक्ष्मण कोमकर आणि गणेश लक्ष्मण कोमकर या दोघांना अटक केली होती. मात्र समोर आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात तब्बल 13 जण या संपूर्ण कटात सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. कौटुंबिक कारणावरून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. पुणे पोलीस या संपूर्ण घटनेचा आता सखोल तपास करीत आहेत.
