भुसावळ विभागात पोळा सण उत्साहात


यावल (3 सप्टेंबर 2024) : शहरात बळीराजाचा सोबती सर्जा – राज्याचा सण पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कष्टकरी शेतकर्‍याच्या सोबत्याला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवून त्याचा श्रृंगार करून, ढोल-ताश्यांच्या गजरात शहरातून मिरवणूक काढत बैलजोडीचा सन्मान करण्यात आला. शहरातील देशमुख वाड्यात मोठा मारोती मंदीरात दर्शनाकरीता बैल जोड्यांना घेवून शेतकरी वर्गाची दिवसभर ये-जा सुरू होती. यंदा पाऊस चांगला झाल्याने बळीराजा आनंदीत आहे. अनेकांनी शेतात जावून मातीच्या बैल-जोडीचे पूजन करीत नैवेद्य वाढवले होते. दिवसभर शहर व तालुक्यात पोळ्याची धामधूम दिसली. यावलच्या आश्रय फौंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी मूळ गावी सातोद येथे बैल जोडीची पूजा करत त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.

दसनूरला बैल पोळा सण साजरा
सिंगनूर : येथून जवळच असलेल्या दसनूर येथे बैल पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गावातून प्रत्येक वर्षी एका शेतकर्‍याच्या बैल जोडीला मान दिला जातो. यावेळी बैल जोडीचा मान तुकाराम सीताराम महाजन यांच्या जोडीला मिळाली. नदीवर बैल पूजन गावाचे पोलीस पाटील दीपक चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य गावातील ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.

बोदवड तालुक्यात साध्या पध्दतीने सण साजरा
बोदवड : बोदवड तालुक्यात सलग दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. वर्षातून एकदा येणार्‍या सणामुळे शेतकर्‍यांमध्ये उत्साह असला तरी पावसामुळे मात्र हा उत्साह कमी झाला आहे. पावसामुळे बैलांची सजावट सुध्दा करण्यात आली नाही त्यामुळे बैल सजावटीसाठी आलेल्या वस्तूंची विक्रीच झाली नाही. सलग पावसामुळे पिकांची वाढ खुंटली असून ओल्या दुष्काळाचे सावट तालुक्यावर आहे. पोळ्याच्या दिवशीही दिवसभर पाऊस कायम होता.
मनुर बु.॥ येथीलल ईश्वर सोनवणे व कान्होपात्रा सोनवणे व त्याच्या परिवाराने बैलांची पूजा केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !