दोन वर्षातील दूध संघातील भ्रष्टाचाराचा एक आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवावा तत्काळ राजीनामा देईल : आमदार मंगेश चव्हाण यांचे विरोधकांना आव्हान

उन्मेश पाटील म्हणजे भ्रष्टाचाराचा शिरोमणी नंबर 1, तर दूध संघाच्या बदनामी करण्यात संचालक प्रमोद पाटील हे उन्मेष पाटील यांच्या हातातले बाहुले ः दूध संघाचे चेअरमन आमदार मंगेश चव्हाण यांचा पलटवार...


जळगाव : फक्त बोलबच्चनगिरी व शब्दांचा खेळ करण्यात पटाईत असणारे उन्मेष पाटील यांची विश्वासार्हता सर्व जिल्ह्याला माहिती आहे. दूध संघांवर आरोप करणारी पत्रकार परिषद हा त्याचाच एक नमुना आहे. अर्धवट माहिती धादांत खोटे आरोप व जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. भेसळ व इतर मुद्यांवर दूध संघाची बदनामी केली म्हणून पुढील काळात विक्रीवर त्याची दुरोगामी परिणाम होणार आहेत. उन्मेष पाटील व प्रमोद पाटील यांनी राजकारण करताना दूध संघाच्या हिताचाही विचार करावा, आपल्या राजकीय वैयक्तिक स्वार्थासाठी दूध संघाच्या विश्वासार्थाबाबत खोटी माहिती पसरू नये. आजपर्यंतच्या इतिहासात दूध संघाच्या दुधात भेसळ झाल्याबाबत साधा आरोप देखील कोणीही केला नाही अगदी स्पर्धकांनी देखील नाही. यासोबतच दूध संघाचा ताळेबंद दूध संघाच्या विद्यमान संचालकाच्या उपस्थितीत वाचला जातो ही बाब गंभीर आहे.

पारदर्शकपणे कामकाज
गेल्या दोन वर्षात दूध संघात मंत्री गिरीशमहाजन, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, मंत्री अनिल ा पाटील व सर्व ज्येष्ठ संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शकपणे काम करत मागील कार्यकाळातील नऊ कोटींचा तोटा भरून काढत यावर्षी नऊ कोटींचा निव्वळ नफा दूध संघाने मिळवला आहे. दुग्धविकास मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे दरवाढ संदर्भात बैठक लावून देखील प्रश्न मार्गी लावला आहे. हे सर्व दूध उत्पादक व शेतकरी वर्गाला माहित आहे. मात्र येत्या 5 तारखेला वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकर्‍यांच्या बोनस बाबत मोठा निर्णय होणार असल्याची चाहूल उन्मेष पाटील यांना लागल्याने याचे श्रेय विद्यमान संचालक मंडळाला जाईल या भीतीने त्यांनी पत्रकार परिषद घेत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र सभासद सुज्ञ आहे त्यांना यामागील सर्व राजकारण समजत असल्याने ते या बोलबच्चन गिरीला बळी पडणार नाहीत हा विश्वास असल्याची प्रतिक्रिया जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.

बेलगंगेच्या नावानेही केले राजकारण
याआधी उन्मेश पाटील यांनी असेच पत्रकार परिषदा घेत बेलगंगेच्या नावाने राजकारण करत आमदारकी मिळवली मात्र त्यानंतर तो मुद्दा त्यांनी सोडून दिला. खासदार झाल्यानंतर गिरणा बदलून बंधार्‍याचे स्वप्न दाखवत मतदारसंघाला झुलवत ठेवले मात्र आपल्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ना बेलगंगा सुरू केला ना गिरणा नदीवर बलून बंधारे बांधले. ठेकेदारांना ब्लॅकमेलिंग करणे, टक्केवारीसाठी तगादा लावणे यासाठी ते कुप्रसिद्ध आहेत. शेतकर्‍यांकडून विहिर मंजुरीचे पैसे जमा करून ते आपल्याला द्यावेत यासाठी उन्मेष पाटील यांनी आमदार असताना तत्कालीन चाळीसगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांकडे तगादा लावला म्हणून सदर गटविकास अधिकारी यांनी विष प्राशन केले होते. माजी खासदार येथे नाना पाटील यांच्या कार्यकाळात मंजूर असणारे चाळीसगाव-धुळे या राष्ट्रीय महामार्गाचे कामाच्या या उन्मेष पाटील यांच्या टक्केवारीच्या तगाद्यामुळे तीन वेळा निविदा काढाव्या लागल्या. अखेर ठेकेदाराने पैसे दिले तेव्हाच या महाशयांनी चाळीसगाव-धुळे रस्त्याचे काम सुरू होऊ दिले तोपर्यंत शेकडो जीव या महामार्गावर गेले, असा आरोपही आमदारांनी केला.

आपल्या टक्केवारीसाठी शेकडो निरपराध लोकांचा जीव घेणारा उन्मेष पाटील हा भ्रष्टाचाराचा शिरोमणी नंबर वन आहे त्यामुळे त्यांनी भ्रष्टाचारावर बोलणे म्हणजे मोठे हास्यास्पद आहे. याच कारणामुळे उन्मेष पाटील यांचे तिकीट नाकारले गेले. आता काहीच काम नसल्याने खोटा शेतकर्‍यांचा व दुध संघाचा कळवळा दाखवत आहे मात्र जेव्हा आम्ही दूध संघातील तूप आणि लोण्याचा भ्रष्टाचार बाहेर काढला त्यावेळी उन्मेष पाटील का मूग गिळून गप्प बसले होते ? त्यावेळी झालेल्या दूध संघातील भ्रष्टाचाराला उन्मेश पाटील यांचे समर्थन आहे का ? एवढाच भ्रष्टाचाराचा तिटकारा होता तर त्यांनी त्यावेळी दूध संघाची निवडणूक का लढवली नाही ? हा साधा प्रश्न माझा आहे.

यासोबतच त्यांनी माजी खासदार उन्मेश पाटील व संचालक प्रमोद पाटील यांनी केलेल्या आरोपांवर आकडेवारी सह उत्तर दिले आहे, गेल्या दोन वर्षात दूध संघात झालेल्या भ्रष्टाचाराचा एक आरोप त्यांनी पुरावासह सिद्ध करून दाखवावा त्याक्षणी राजीनामा देईल. असे आव्हान देखील आमदार व दूध संघाचे चेअरमन मंगेश चव्हाण यांनी दिले आहे.

यासोबतच एका गंभीर बाबीकडे चेअरमन आमदार मंगेश चव्हाण यांनी लक्ष वेधले आहे. जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा ही येत्या 5 तारखेला होणार आहे मात्र ती होण्यापूर्वीच संघाची बॅलन्स शीट ही उन्मेष पाटलांच्या हातात कशी येते व त्याची माहिती देखील उन्मेष पाटील हे संचालक प्रमोद पाटील यांच्या उपस्थितीत पत्रकारांना देतात ही बाब गंभीर व बेकायदेशीर आहे. पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील हे उन्मेष पाटील यांच्या हाताचे बाहुले झाले आहेत अशा पद्धतीची त्यांची त्यावेळची देहबोली पाहताना निश्चितपणे एक दूध संघाचे चेअरमन म्हणून वाईट वाटले आणि या बेकायदेशीर कृतीला समर्थन देणे हे देखील संचालक प्रमोद पाटील यांचे अपयश म्हणावे लागेल, असा आरोप देखील आमदार चव्हाण यांनी केला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !