बैल धुण्यासाठी गेलेल्या हरणखेडच्या शेतकर्याचा पाण्यात बुडून मृत्यू
बोदवड (3 सप्टेंबर 2024) : बोदवड तालुक्यालगतच्या विदर्भातील हरणखेड येथे नदीत बैल धुताना सोमवारी सकाळी शेतकरी बैलासह वाहिला. पोळ्याच्या दिवशी घडलेल्या या दुर्घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. गोपाल प्रभाकर वांगेकर (28) असे मयताचे नाव आहे.
बैलासह वाहिला शेतकरी
हरणखेड गावातील गोपाल वांगेकर हा शेतकरी पोळा सणाला बोदवड-मलकापूर तालुक्यातील व्याध्रा नदीच्या पुरात बैल धुण्यासाठी गेला असता पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यानंतर शेतकरी बैलासह वाहून गेला. या घटनेची माहिती कळताच एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले व मृतदेह नदीतील झुडपांमधून काढण्यात आला मात्र बैल सापडला नाही. या दुर्घटनेने दोन्ही हरणखेड गावात पोळा सण साजरा झाला नाही. शेतकरी गोपाळ वांगेकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे.

