रस्ता लुटीचा डाव उधळला : पुणे-निफाड भागातील टोळी शिरपूर तालुका पोलिसांच्या जाळ्यात
गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसांसह एक लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त
Road robbery plot foiled: Pune-Nifad area gang in Shirpur taluka police net धुळे (3 सप्टेंबर 2024) : पिस्टलाच्या धाकावर लूट करण्याच्या उद्देशाने आलेल्या पुणे व निफाड भागातील चौघांच्या टोळीला शिरपूर तालुका पोलिसांनी शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींच्या ताब्यातून दोन जिवंत काडतूसांसह पिस्टल तसेच दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. 2 सप्टेंबर रोजी दुपारी 1.10 वाजता ही कारवाई करण्यात आली.
चौकडी जाळ्यात : एक संशयीत पसार
रस्ता लूटीच्या उद्देशाने घातक शस्त्रांसह आरोपी आल्याची माहिती शिरपूर तालुका निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. त्यानुषंगाने त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. रोहिणी-भोईटी गावाच्या परिसरात संशयीत आल्यानंतर पथकाने दुपारी 1.10 वाजेच्या सुमारास नाकाबंदी केली. चिलारे गावाजवळ दोन दुचाकीवरून पाच संशयीत आल्यानंतर पथकाने रस्ता अडवला मात्र एक संशयीत जंगलात पसार होण्यात यशस्वी झाला तर चौघांना पकडण्यात यश आले. अटकेतील आरोपींमध्ये रोनाल्ड अनिल निर्मल (25, कुंजरवाडी, लोणी काळभोर, ता.हवेली, जि.पुणे), सिध्दार्थ नाना घेगडमल (25, नैताळे, ता.निफाड, जि.नाशिक), सचिन रामा काळे (24, मु.पो.नैताळे, ता.निफाड, जि.नाशिक), रोहोत अनिल चौधरी (26, मु.पो.सोतरापवाडी, ता.हवेली, जि.पुणे) यांचा समावेश आहे. दरम्यान, अटकेतील आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. आरोपी रोनाल्ड निर्मल, सिध्दार्थ नाना घेगडमल, सचिन रामा काळे यांच्याविरोधात 2019 ते 2023 दरम्यान खुनासह 307, 326, 385 तर आरोपी रोहित अनिल चौधरी विरोधात 326 अन्वये गुन्हा दाखल आहे.
एक लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त
आरोपींच्या ताब्यातून 25 हजार रुपये किंमतीची गावठी बनावटीची पिस्टल, दोन हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस, 50 हजार रुपये किंमतीची बजाज कंपनीची ची पल्सर, 30 हजार रुपये किंमतीची एक होंडा कंपनीची अॅक्टीव्हा, 60 हजार रुपये किंमतीचे चार मोबाईल, शंभर रुपये किंमतीची एक चिली स्प्रेची बाटली, 500 रुपये किंमतीचा सुती दोरखंड असा एकूण एक लाख 67 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सुनील वसावे, कैलास जाधव, संतोष पाटील, सदिीप ठाकरे, जाकीर शेख, अलताफ मिर्झा, मनोज नेरकर, कृष्णा पावरा, इसरार फारुकी, योगेश मोरे, संजय भोई, स्वप्निल बांगर आदींच्या पथकाने केली.