जळगाव बीएचआरच्या अवसायकासह वसुली अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
कर्ज रक्कम भरण्याच्या परवानगीसाठी स्वीकारली दिड लाखांची लाच
Jalgaon BHR officials along with recovery officers in ACB net जळगाव (3 सप्टेंबर 2024) : राज्यस्तरीय कार्यक्षेत्र असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या जळगावातील अवसायकासह वसुली अधिकार्याला दिड लाख रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक एसीबीने जळगावातील मुख्य कार्यालयातच मंगळवारी सायंकाळी अटक केल्याने सहकार वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. चैतन्य हरिभाऊ नासरे (57, मूळ राहणार 25, आश्रय अपार्टमेंट, फ्लॅट नंबर एक व तीन, पंचशील वाचनालयाजवळ, गांधीनगर, नागपूर) असे अटकेतील अवसायकाचे तर सुनील गोपीचंद पाटील (54, रा.डी 20, सुकृती पिनॅकल अपार्टमेंट,गुजराल पेट्रोल पंप जवळ, जळगाव) असे वसुली अधिकार्याचे नाव आहे.
असे आहे लाच प्रकरण
43 वर्षीय तक्रारदार यांची आई व मोठा सख्खा भाऊ यांनी भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडमधून कर्ज घेतले होते. त्यांनी या कर्जाचे वेळोवेळी हप्ते भरले असून त्यांची आई व भाऊ यांच्याकडे थकीत असलेल्या कर्ज रक्कमेची एक रक्कमी (वन टाईम सेटलमेंट) किती रक्कम भरावी लागेल ? याची चौकशी करण्यासाठी तक्रारदार हे जळगवातील संस्थेच्या मुख्य कार्यालयात गेल्यानंतर वसुली अधिकारी सुनील पाटील यांनी तक्रारदार यांच्या आई व व भाऊ यांच्याकडे थकीत असलेल्या/वसूल करावयाच्या मुद्दल कर्ज रकमेच्या पाच टक्के रक्कम भरण्याची अवसायक चैतन्य नासरे यांच्याकडून परवानगी देण्याच्या मोबदल्यात दोघांसाठी दिड लाख रुपयांची लाच 14 ऑगस्ट 2024 रोजी मागितली होती व लाच रक्कमेत तडजोड होणार नसल्याचेही तक्रारदाराला बजावल्यानंतर त्यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार नोंदवली व लाच पडताळणीनंतर सापळा रचण्यात आला.
कार्यालयात स्वीकारली लाच
आरोपी अवसायक चैतन्य नासरे यांनी लाच रक्कम आरोपी सुनील पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यास सांगितल्यानंतर मंगळवारी सायंकाळी तक्रारदाराने रक्कम दिली व लागलीच एसीबीने दोघांना अटक केली.
यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, स्वप्नील राजपूत (वाचक पोलीस निरीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक एसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप बबन घुगे, पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस नाईक गणेश निंबाळकर, पोलीस शिपाई नितीन नेटारे, पोलीस हवालदार प्रभाकर गवळी, पोलीस शिपाई सुरेश चव्हाण, चालक पोलीस हवालदार संतोष गांगुर्डे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.