सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी
Devotees flock to Satapuda resident Ai Manudevi temple यावल (4 सप्टेंबर 2024) : सातपुड्याच्या निर्सगरम्य वातावरणात हजारो भाविकांनी सातपुडा निवासिनी आई मनुदेवीचे दर्शन घेेतले. मोठ्या उत्साहात मंगळवारी यात्रोत्सव पार पडला. सकाळपासून आडगाव गावाकडून श्री क्षेत्रावर जाण्याकरीता भाविक-भक्तांची ये-जा सुरू होती.
पावसातही भाविकांचा उत्साह कायम
आडगाव-कसारखेडा, ता.यावल जवळील सातपुड्याच्या कुशीत खान्देशाचे कुलदैवत आई मनुदेवीचे मंदिर आहे. या मंदिरावर दरवर्षी श्रावणमासाच्या पिठोरी आवश्येच्या दुसर्या दिवशी यात्रा असते. सातपुड्याच्या नटलेल्या वनराईत निसर्गरम्य वातारणात येथे मंगळवारी यात्रेनिमित्त मोठ्या संख्येत राज्यासह शेजारील राज्यातील भाविकांनी सकाळ पासून दर्शनासाठी गर्दी केली. अनेक कुटुंबीयांनी आई मनुदेवीकडे मानलेले नवस देखील फेडले. यात्रेनिमित्त मंदिर संस्थानचे अध्यक्ष शांताराम पाटीलसह यावल पोलीस निरीरक्षक प्रदीप ठाकुर यांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. दिवसभर सातपुड्याच्या वनराईत रिप-रिप पाऊस सुरू होता. पाऊस असतांना देखील भाविक-भक्तांचा उत्साह कमी नव्हता.

दर्शनाकरीता व्यवस्था
मंदिर परिसरात व गाभार्यात यंदा चांगली दर्शन व्यवस्था केल्याने भाविकांना शांततेत दर्शन घेता आले. वाहन तळापासून ते मंदिरापर्यंत रस्ते मोकळे असल्याने भाविकांना फारशी अडचण आली नाही.
