एचडीएफसी बँकेचा प्रतिनिधी बोलत असल्याचे सांगून निवृत्त कर्मचार्यास पावने तीन लाखांचा गंडा
Retired employee paid Rs 3 lakh for saying he was speaking as a representative of HDFC Bank जळगाव (4 सप्टेंबर 2024) : एचडीएफसी बँकेचा प्रतिनिधी बोलत असल्याचे भासवून आयडीची मागणी करत भामट्याने एका सेवानिवृत्त कर्मचार्याला दोन लाख 78 हजार 885 रुपयांना ऑनलाईन गंडा घालण्यात आला. याप्रकरणी मंगळवार, 3 रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
असे आहे फसवणूक प्रकरण
59 वर्षीय गृहस्थ जिल्हापेठ पोलीस ठाणे हद्दीत कुटुंबासह वास्तव्यास आहेत. 15 ऑगस्ट रोजी त्यांना व्हॉटसअॅपवरुन मोबाईल क्रमांकावर कॉल आला. एचडीएफसी बँकेचा प्रतिनिधी बोलत आहे, असे सांगत भामट्याने तुमची ई केवायसी करावी लागेल, अशी थाप दिली. त्यानंतर पॅन कार्ड, आधार कार्ड तसेच क्रेडीट कार्ड लागेल, असे सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने व्हाटसपवर वैयक्तिक माहिती टाकली. त्यानंतर त्यांच्या खात्यातून ऑनलाईन पैसे विड्राल झाल्याचे मेसेज त्यांना प्राप्त झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकरणी आज गुन्हा दाखल झाला. तपास महिला पोलीस हवालदार वंदना चव्हाण या करीत आहेत.
बँक विचारणा करीत नाही
केवायसी करण्यासाठी अथवा आयडी प्रुफ तपासावयाचे आहे, असे सांगून ग्राहकांकडून बँक काहीही मागवित नाही मात्र सायबर गुन्हेगार सरकारी संस्था, रिझर्व्ह बँकेचे अधिकारी बोलत आहे, असे भासवून ग्राहकांची फसवणूक करत असतात. या गुन्हेगारांच्या कॉलपासून ग्राहकांनी सावध रहावे, असे आवाहन नेहमी रिझर्व्ह बँकेकडून ग्राहकांना केले जाते. तरीही ग्राहक सायबर गुन्हेगारांच्या भुलथापांना बळी पडतात व आर्थिक फसवणूक होते, याचा परिचय या घटनेतून आला आहे.