भुसावळात नाहाटा कॉलेजजवळील जलकुंभ तीन तासाहून अधिक ओव्हरफ्लो


Water Tank Near Nahata College in Bhusawal Overflows for Over Three Hours भुसावळ (27 एप्रिल 2026) : भुसावळ शहरात तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले असताना नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे लाखो लिटर शुद्ध पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहून वाया गेल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. नाहटा कॉलेज परिसरातील जलकुंभ शनिवारी रात्री तब्बल 3 ते 5 तास ओव्हरफ्लो होत राहिला, मात्र याकडे पालिका प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.

लाखो लीटर पाणी वाया
महामार्गालगत असलेल्या या जलकुंभामध्ये रात्री सुमारे 10 वाजेपासून पाणी भरण्याचे काम सुरू होते मात्र जलकुंभ पूर्ण भरल्यानंतरही पाणीपुरवठा बंद न केल्याने शुद्ध पिण्याचे पाणी थेट रस्त्यावर वाहू लागले. हा प्रकार पहाटे एक वाजेपर्यंत सुरू राहिल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली.

हा प्रकार प्रभागाचे नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ नगरपालिका पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संबंधित कर्मचार्‍यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर उपमुख्याधिकारी परवेज शेख यांना माहिती देण्यात आली. त्यांनी पालिकेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर सूचना दिल्या, तरीही रात्री उशिरापर्यंत एकही कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नाही, असा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, पाणीपुरवठा यंत्रणेत नुकत्याच भरती झालेल्या कंत्राटी कामगारांवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हे कामगार प्रत्यक्ष कामावर न जाता केवळ हजेरी लावून घरी परत जात असल्याचे नगरसेवक ठाकूर यांनी सांगितले. जलकुंभावर नेमलेले कर्मचारी व कंत्राटी कामगार जबाबदारीकडे दुर्लक्ष करत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

भुसावळ शहरात सध्या पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सुमारे 700 कूपनलिका व बोअरवेल आटल्या असून नागरिकांना 12 ते 14 दिवसांनी एकदाच नळाला पाणी मिळत आहे. शहराचा पारा 45 अंशांच्या पार गेल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. खडका चौफुलीसह अनेक भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून दररोज 20 ते 25 टँकरची गरज भासत आहे.

अशा गंभीर परिस्थितीतही पालिका प्रशासनाकडून पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आलेली ढिलाई आणि निष्काळजीपणा या घटनेतून उघड झाला आहे. एकीकडे नागरिकांना पाण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागत असताना दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

कर्मचार्‍यांचा निष्काळजीपणा कारणीभूत : महेंद्रसिंग ठाकूर
शहरात नागरिकांना 12 ते 14 दिवसांनी पाणी मिळत असताना लाखो लीटर शुद्ध पाणी रस्त्यावर वाहून जाणे ही अत्यंत संतापजनक बाब आहे. संबंधित जलकुंभावर जबाबदार कर्मचारी व कंत्राटी कामगार पूर्णतः निष्काळजीपणा करत आहेत. फोन करूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, ही बाब गंभीर आहे. पाणीपुरवठा यंत्रणेत काही कंत्राटी कामगार केवळ हजेरी लावून कामावर गैरहजर राहतात, हा प्रकार तत्काळ थांबवावा. दोषींवर कठोर कारवाई करून नागरिकांना नियमित व नियोजित पाणीपुरवठा करावा, असे नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !