गिरणा पात्रातील अवैध वाळू उपश्याचे फोटो काढताच वाळूमाफियांचा हवेत गोळीबार : नऊ संशयीतांविरोधात गुन्हा


जळगाव (19 सप्टेंबर 2024) : गिरणा नदी पात्रातून वाळूचा अवैध उपसा सुरू असताना कोतवालाने फोटो काढल्याचा राग आल्याने वाळू माफियाने हवेत गोळीबार करुनन दहशत पसरवली. ही घटना मंगळवारी दुपारी चार वाजता चांदसर, ता.धरणगाव येथे घडली. या घटनेप्रकरणी एकुण नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
योगेश ईश्वर कोळी, आबा ईश्वर कोळी, गणेश सोमा कोळी, मोहन गोविंदा कोळी, कल्पेश महेश पाटील, राहुल भीमराव कोळी, राहुल दिलीप, कोळी (सर्व रा. चांदसर, ता. धरणगाव) तसेच गोपाल कोळी, दीपक कोळी (दोन्ही रा. वाकटुकी, ता. धरणगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयीतांची नावे आहेत. कोतवाल अमोल मालचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असे आहे प्रकरण
चांदसर गावातील नदीपात्रातून वाळू उपसा सुरू असल्याने अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गावाबाहेर चार्‍या खोदून रस्ता बंद करण्यात आला. तरीदेखील अवैध वाळू उपसा सुरू ठेवण्यासाठी वाक टुकी येथील काहीजण चार्‍या बुजवत होते. हा प्रकार कोतवाल अमोल गुलाब मालचे यांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन संबंधितांना याबाबत जाब विचारला. त्यावर वाळू माफियांनी शिवीगाळ करत मालचे यांना जिवे मारण्याची धमकी दिली. गोपाल कोळी याने त्याच्याजवळ असलेल्या पिस्तूलने हवेत गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात खळबळ माजली.

या घटनेची माहिती समजताच पाळधी पोलिसांचे पथक गावात पोहोचले. धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयितांच्या मागावर पोलिस पथक रवाना झाले आहे.

 


कॉपी करू नका.