ओडीसामध्ये बस अपघात : जळगावच्या जखमींना नुकसान भरपाई देण्याचे आदेश


जळगाव (30 सप्टेंबर 2024) : देवदर्शनासाठी गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या यात्रा कंपनीच्या बसला ओडीसामध्ये अपघात झाला. यामध्ये एका भाविकाचा मृत्यू तर पाच जण जखमी झाले होते. या भाविकांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश लोकन्यायालयाने दिले.

असे आहे अपघात प्रकरण
जळगाव जिल्ह्यातील काही भाविक 5 फेब्रुवारी 2023 रोंजी शोभा पिंताबर बाविस्कर (कळगाव) यांच्या यात्रा कंपनीकडून देवदर्शनासाठी जगन्नाथपुरी येथे गेले होते. बसचा ओडिसा येथील बारग्रह जिल्ह्यात अपघात झाला. या अपघातात जळगाव येथील एकाचा मृत्यू तर पाच भाविक जखमी झाले होते. या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच आमदार सुरेश भोळे यांच्याशी संपर्क साधुन जिल्हाधिकार्‍यांमार्फत अपघातग्रस्त भाविकांना मदत कार्य पुरविले. औषधोपचाराअंती या भाविकांना जळगाव येथे आणण्यात आले होते.

सोहेला पोलिसात गुन्हा
बस (क्रमांक जी.जे.05 बी.एफ.3423) तसेच टँकर (क्रमांक सीजी 22 एक्स 2221) या दोन वाहनामध्ये धडक होऊन अपघात झाला. या प्रकरणी टँकर चालकाविरुध्द सोहेला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. टँकरमुळे प्रवाश्यांना दुखापत झाली होती. वाहन चालकाने जखमीच्या उपचारासाठी खर्च केला होता मात्र या दुर्घटनेत अपंगत्व व झालेली नुकसान भरपाई मिळावी, यासाठी काही अपघातग्रस्त प्रवाश्यांनी अ‍ॅड.महेंद्र चौधरी यांच्यामार्फत येथील मोटार अपघात दावा प्राधिकरण येथे नुकसान भरपाईचा दावा दाखल केला. या दाव्यात टँकर चालक, मालक व नॅशनल इंन्शुरन्स विमा कंपनी हजर होवून म्हणणे मांडले.

तीन्ही पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर हे प्रकरण लोकन्यायालयासमोर ठेवण्यात आले. लोकन्यायालय पॅनल क्र. 2 चे अध्यक्ष न्या. शरद पवार व सदस्य यांच्या समक्ष हे चारही प्रकरणे निकाली काढण्यात आले. यात जखमी लता अशोक अत्तरदे यांना 9 लाख 66 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे ठरले. जखमी अर्जदार कोर्टाच्या पायर्‍या न चढु शकल्याने थेट लोकअदालत वाहन तळात आले. जखमीची वेरिफिकेशन केले. त्यानंतर निवाडा जाहीर केला.

या महिलेचे पती अशोक चिंधु अत्तरदे (रा.नेपानगर ) यांचा मृत्यू झाला होता. त्यांना पाच लाख 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. जखमी विमल दामोदर गजभीरे (संभाजीनगर) यांना तीन लाख 25 हजार , जखमी मंगलाबाई साहेबराव चौधरी यांना 95 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. शारिरीक व मानसिक त्रासापोटी तसेच अपंगत्वापोटी एक लाख 25 हजार रुपये अतिरिक्त असे दोन लाख 20 हजार देण्याचे आदेश विमा कंपनी यांना देण्याचा आदेश केला. सर्व अपघातग्रस्तांकडून अ‍ॅड.महेंद्र चौधरी, अ‍ॅड. श्रेयस चौधरी, अ‍ॅड.उज्वला पाटील यांनी कामकाज पाहिले. नॅशनल विमा कंपनीकडून अ‍ॅड.दीपक खाडीलकर, टँकर वाहन मालकाकडून अ‍ॅड.सुनील चव्हाण यांनी कामकाज पाहिले. सर्व जखमींनी लोकन्यायालयाचे पॅनल व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांचे आभार मानले.

 


कॉपी करू नका.