भुसावळात विधानसभा निवडणुकीपूर्वी सहा उपद्रवींना हद्दपार करण्याच्या हालचाली
पोलिसांकडून प्रस्ताव रवाना : चौकशीला सुरूवात ; निवडणूक निर्भय वातावरणात पार पाडण्याचे नियोजन
Moves to deport six miscreants ahead of assembly polls in Bhusawal भुसावळ (12 ऑक्टोबर 2024) : विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी शहरातील उपद्रवींना हद्दपार करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहा जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आले असून त्या प्रस्तावांची चौकशी सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच उपद्रवींना हद्दपार करण्यावर पोलीस प्रशासनाचा भर आहे.
उपद्रवी निवडणुकीत जिल्ह्याबाहेर !
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी पोलीस प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी वृत्तीच्या व पोलिसांच्या यादीवरील सहा जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले असून हे प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत. प्रांताधिकारी यांच्याकडून हे प्रस्ताव डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्याकडे चौकशीला देण्यात आले आहे. येत्या तीन दिवसात सहाही प्रस्तावातील लोकांना बोलावून त्यांची चौकशी करून अहवाल प्रांताधिकार्यांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर प्रांताधिकारी हे संबंधितांचे म्हणणे ऐकून योग्य तो आदेश करणार आहेत. येत्या आठवड्याभरात हद्दपारीची प्रक्रिया गतीमान पध्दतीने राबविली जाणार आहे. विधानसभा निवडणूक शांततेत पार पडाव्यात यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.
एमपीडीएचे दोन प्रस्ताव
पोलीस प्रशासनाकडून हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले असून त्यासोबत पोलिसांनी एमपीडीएचे दोन प्रस्ताव तयार केले आहे. ते प्रस्ताव सुध्दा मंजुरीसाठी प्रशासनाकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. त्यावर सुध्दा लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.