भुसावळ न्यायालयातून पसार झालेल्या कुविख्यात बाबा काल्याला अखेर अटक


शौचाचा बहाणा करीत पोलिसांच्या हातावर दिली होती तुरी

भुसावळ- दरोड्याच्या गुन्ह्यातील कुविख्यात गुन्हेगार आसीफ बेग (बाबा काल्या) असलम बेग याने शुक्रवार, 2 ऑगस्ट रोजी पोलिसांच्या हातावर तुरी देत भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयातून पळ काढला होता. तब्बल 19 दिवसानंतर आरोपीच्या चाळीसगाव रेल्वे स्थानकावरून मुसक्या आवळण्यात यश आले आहे.

सुरत जाण्यापूर्वीच चाळीसगावातून आवळल्या मुसक्या
तब्बल 19 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देताना आरोपी बाबा काल्या चाळीसगाव येथून सुरत जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून बुधवारी पहाटे त्याच्या चाळीसगाव रेल्वे स्थानकावरून मुसक्या आवळण्यात आल्या. पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील हवालदार राजेंद्र साळुंके, हवालदार मनोहर शिंदे, सुनील थोरात, सुनील सैंदाणे, निलेश बाविस्कर, अमोल विसपुते, विकास पाटील, प्रवीण जाधव आदींनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीला भुसावळ शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

शौचाचा बहाणा करीत काढला पळ
अट्टल आरोपी असलेल्या बाबा काल्याविरुद्ध जबरी चोरी, रस्ता लुटीसह शरीराविरुद्ध हल्ला केल्याचे तब्बल सहा गुन्हे दाखल आहेत. 5 जुलै रोजी रजा चौक परीसरात अरबाज शकील आझाद (22) याच्या खिशातील सहा हजार 200 रुपये काढताना तक्रारदाराने प्रतिकार केल्याने बाबा काल्याने त्याच्यावर चाकू हल्ला करून पळ काढला होता तर आरोपीच्या 17 जुलै रोजी मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. आरोपी जळगावच्या कारागृहात न्यायालयीन कोठडीवर असल्याने त्याच्यासह कलीम शेख या दोघांना न्यायालयीन कामानिमित्त शुक्रवार, 2 ऑगस्ट दुपारी जळगाव कारागृहातील विकास पाटील यांच्यासह तीन पोलिस कर्मचारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात घेवून आले होते. आरोपी बाबा काल्याने शौच लागल्याचा बहाणा केला तर यावेळी कर्मचारी शौचालयाबाहेर पहारा देत असताना आरोपीने शौचालयाचा नळ सुरू करीत खिडकीच्या काचा काढून पळ काढला होता. बराच वेळ होवूनही आरोपी बाहेर न आल्याने शौचालयाचा दरवाजा तोडल्यानंतर आरोपी पसार झाल्याची घटना उघडकीस आली होती. तब्बल 19 दिवसांपासून आरोपीचा शोध सुरू असताना त्याच्या बुधवारी पहाटे मुसक्या आवळण्यात यंत्रणेला यश आले.


कॉपी करू नका.