भुसावळातील ईव्हीएम गोदापासून शंभर मीटर अंतरात फटाके फोडण्यास मनाई
निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांचे आदेश

भुसावळ (30 ऑक्टोबर 2024) : दिवाळीतील फटाक्याची ठिणगी ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या गोदामावर पडल्यानंतर किरकोळ आगीची घटना गतवर्षी घडली होती. या अनुषंगाने प्रांताधिकार्यांनी यंदा अशी कुठलीही अप्रिय घटना टाळण्यासाठी ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या गोदामापासून शंभर मीटर अंतरावर फटाके फोडण्यास मनाई करीत त्याबाबत आदेश जारी केले आहेत. गोदामाच्या 100 मीटर अंतरात कुणीही फटाके फोडू नये तसेच कुणी फटाके फोडल्यास त्यांच्याविरुध्द कारवाई केली जाईल, अशा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिला आहे.
फटाके फोडण्यास मनाई
भुसावळ तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या गोदामात विधानसभा निवडणुकीसाठी लागणारे ईव्हीएम ठेवण्यात आले असून फटाके, रॉकेट यामुळे गोदामास आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने प्रांताधिकारी आदेश काढत गोदामाच्या शंभर मीटर पसिरात फटाके फोडण्यास व उडविण्यास प्रतिबंध घातला आहे. 28 ऑक्टोबरपासून पुढील आदेश होईपर्यत हा आदेश लागू असेल. गोदामाजवळ पाण्याने भरलेली अग्निशमन दलाची गाडी, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

