मारकडवाडी गावातील उठाव पाहण्यासाठी आलो : नाना पटोले

बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचे आदेश काढल्यास राजीनामा देण्यासही तयार


मारकडवाडी (10 डिसेंबर 2024) : मारकडवाडी गावातील गावकर्‍यांनी उठाव केला असून हा उठाव पाहण्यासाठी मी येथे आलो असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. यावेळी त्यांनी सरकार, पोलिस प्रशासन आणि निवडणूक आयोग यांच्यावर टीका केली. मी आणि उत्तम जानकर राजीनामा द्यायला केव्हाही तयार आहोत मात्र बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचे आदेश काढा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.

निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद
भाजपच्या नेत्यांना सत्तेची गुरमी चढली असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. मात्र, खर्‍या अर्थाने निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. आम्ही जे आक्षेप घेतले, त्या आक्षेपाला उत्तर देण्याची मागणी त्यांनी केली. 76 लाख मते कशी वाढली? यावर आमचा आक्षेप असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. मॉकपोलला निवडणूक आयोग आणि पोलिसांचा विरोध का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. मारकडवाडी ग्रामस्थांनी लोकशाही वाचवण्यासाठी भूमिका घेतली आहे. आता निवडणुका पुन्हा होणार नाही, मात्र लोकांची मते जाणून घेणे महत्त्वाचे असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.


मारकडवाडीच्या भूमिकेकडे आता देशाचे लक्ष लागले असल्याचा दावा पटोले यांनी केला आहे. शेतकरी आंदोलनावर लाठीचार्ज केला जात आहे. तरुण आपला हक्क मागण्यासाठी जातात तर त्यांच्यावर देखील लाठीचार्ज केला जात आहे. ही हुकूमशाही आहे का? असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनवर निवडणुका न घेता बॅलेट पेपरवर निवडणूक घेणार असे आदेश काढावे, त्यानंतर राजीनामा द्यायला आम्ही देखील तयार असल्याचेही पटोले यांनी म्हटले आहे.

निवडणूक आयोग कोणाची कठपुतली झाली आहे, हे सर्वांना माहिती आहे. 76 लाख मत कशी वाढली याचा हिशोब निवडणूक आयोग का देत नाही? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. देशातील नागरिकांचे जे मत आहे, त्याचाच आवाज उठवण्याचा काम मारकडवाडी येथील लोकांनी केले आहे. ही लोकशाही वाचवण्याची लढाई आहे. या लढाईत सर्वांनी सामील व्हायला हवे, ही आमची भूमिका असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !