जळगाव महापालिकेतील लाच प्रकरण : मनपा आयुक्तांची चार तास कसून चौकशी


Jalgaon Municipal Corporation bribery case: Municipal Commissioner questioned for four hours जळगाव (11 डिसेंबर 2024) : बांधकाम झालेल्या घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात 15 हजारांची लाच स्वीकारताना जळगाव मनपातील नगररचना सहाय्यक अधिकारी मनोज समाधान वन्नेरे यास दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. संशयीताने लाच प्रकरणात महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे व नगर रचना अधिकारी दिघेश तायडे यांचेदेखील नाव घेतल्यानंतर मंगळवारी तायडे यांची तर बुधवारी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची चार तास कसून चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

असे आहे लाच प्रकरण
जळगाव तालुक्यातील खेडी बुद्रुक येथील तक्रारदार यांनी बांधकामाचे परवानगीचे व बांधकाम झालेले घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे प्रकरण जळगाव महानगरपालिकेत मंजुरीसाठी टाकले होते. नगररचना सहाय्यक अधिकारी मनोज वन्नेरे यांनी सुरुवातीला पहिल्या प्रकरणात 21 हजारांची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती 15 हजार रुपये देण्याचे ठरले तसेच दुसर्‍या प्रकरणात 15 हजार रुपये महापालिका आयुक्त आणि सहाय्यक संचालक यांना देण्यासाठी मागितले. एकूण त्यांनी 30 हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार तक्रादार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पथकाने सोमवारी 9 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता सापळा रचत वन्नेरे यास अटक करण्यात आली.

आयुक्तांची चार तास कसून चौकशी
संशयीताने लाच प्रकरणात महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे व नगर रचना अधिकारी दिघेश तायडे यांचेदेखील नाव घेतल्याने मंगळवारी तायडे यांची कसून चौकशी करण्यात आली तर बुधवारी आयुक्त ढेरे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योेगेश ठाकूर यांनी त्यांची लाच प्रकरणाच्या अनुषंगाने कसून चौकशी केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !