मित्राची पोलिसात निवड झाल्यानंतर सेलिब्रेशनासाठी निघालेल्या चौघा तरुणांचा अपघातात मृत्यू
अंबाजोगाई (11 डिसेंबर 2024) : पोलिसात भरती झालेल्या मित्राचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आयोजित पार्टी करून स्विफ्ट डिझायरने गावाकडे परतत असताना ट्रकवर वाहन आदळल्याने चौघा तरुणांचा मृत्यू झाला इतर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात अंबाजोगाई तालुक्यातील आंबासाखर कारखाना ते लातूररस्त्यावर असलेल्या वाघाळवाडीजवळ मंगळवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातातील मयत व जखमी सर्व कारेपूर (ता. रेणापूर, जि. लातूर) येथील आहेत.
कारेपूर येथील सहा तरुण आपल्या निवड झाल्यामुळे त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा येथे पार्टी करण्यासाठी आले होते. मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ते मांजरसुंबा येथून आपल्या स्विफ्ट डिझायर कारमधून (एमएच-14- एलएल-6749) कारेपूर या ठिकाणी जाण्यासाठी निघाले होते. त्यांची कार सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आंबासाखर कारखान्याजवळच असलेल्या वाघाळवाडी फाट्यावर आली असता समोरून येणार्या ट्रकला (केए-52-4201) जोराची धडक दिली.

हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा चुराडा झाला. अपघातात बालाजी शंकर माने (30), फारुख बाबुमियाँ शेख (30), दीपक दिलीप सावरे (32) यांचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांपैकी ऋत्विक हनुमंत गायकवाड (30) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुबारक सत्तार शेख (34), अजित पाशुमिया शेख (30) हे गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पडवळ, पोलीस कर्मचारी नाना राऊत व त्यांच्या इतर सहकार्यांनी धाव घेतली. दरम्यान, या महामार्गावर आजपर्यंत अनेक अपघात झाले असून या महामार्गाचे चौपदरीकरण करण्याची मागणी पुढे येत आहे.

