मुक्ताईनगरात उघड्यावर मांस विक्रीने संताप : आंदोलनाचा इशारा
मुक्ताईनगर (12 डिसेंबर 2024) : आदिशक्ती संत मुक्ताई साहेबांच्या पद स्पर्शाने पुनीत झालेली भूमीवर नगरपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उघड्यावरील मांस व मासे विक्री सुरू असल्याने वारकरी संप्रदायातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बर्हाणपूर रोडवरील तसेच जुनेगाव रोडवरील उघड्यावरील मांस व मासे विक्री ही वारकर्यांचीच नव्हे तर शालेय किशोरवयीन विद्यार्थ्यांची देखील डोकेदुखी ठरली आहे.
कत्तलखाना सोडून उघड्यावर मांस विक्री
जुने गाव आठवडे बाजारात लाखो रुपये खर्च करून स्वतंत्र कत्तलखाना बांधलेला असताना मासे व मांस विक्रेते विना परवनगी मनमानी करून उघड्यावर कत्तलखाने थाटून लोक भावनांशी खेळण्याचा संतापजनक प्रकार करीत आहेत. एकादशीलादेखील खुलेआम उघड्यावरील मांस विक्री सुरू असते. विशेष म्हणजे उघड्यावरील मांस विक्री संदर्भात कायदा असल्यावरही नगरपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने वारंवार निवेदन देवूनही कारवाई होत नसल्याने जनभावना तीव्र झाल्या आहेत. दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यांची होती उपस्थिती
नगरपंचायत प्रशासनाला निवेदन देताना संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, जूने मंदिर व्यवस्थापक उद्धव जुनारे महाराज, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संपर्क प्रमुख संजन पाटील, महिला आघाडी जिल्हाप्रमुख कल्पना पालवे, कीर्तनकार दुर्गा संतोष मराठे, नगरसेविका सविता भलभले, रामरोटी आश्रमाचे किशोर गावंडे, किरण महाजन, सचिन जैन, बाळा चिंचोले, निलेश सावळे, सचिन हिवराळे, विविध हिंदू संघटना, दुर्गा मंडळे, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

