भरधाव कार झाडावर आदळली : रावेरातील तिघे मित्र ठार, तीन गंभीर
मित्राचा वाढदिवस साजरा करून परतणार्या युवकांवर काळाचा घाला
सावदा (प्रतिनिधी) : भुसावळकडून रावेरला येणार्या होंडा सिटी कार क्रमांक (एम.एच.20 सी.एच.8002) ही कार लिंबाच्या झाडावर धडकून झालेल्या अपघातात तिघा मित्रांचा करुण अंत झाला. गुरुवारी रात्री एक वाजेच्या सुमारास हा अपघात घडला तर कारचा अपघातात चुराडा झाला. शुभम दशरथ सोनार (22), मुकेश किशोर रायपूरकर (24) व जयेश केशव भोई (22, सर्व रा.रावेर) अशी मृतांची नावे आहे तर विजय जाधव, गणेश भोई व अक्षय उन्हाळे हे तिघे मित्र गंभीर जखमी झाले.
मित्राच्या वाढदिवसाला शोककळा
या दुर्दैवी घटनेने रावेर परिसरात शोककळा पसरली आहे. अपघातात ठार झालेला मुकेश रायपूरकर याचा वाढदिवसाच्या दिवशीच अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 3 जण जखमी असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच मध्यरात्रीपासून आमदार अमोल जावळे यांनी मृतांच्या व जखमींच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांना धीर दिला आहे.
या अपघातात जखमीवर उपचार सुरु असलेल्या रुग्णालयातील डॉक्टरांशी जावळे यांनी संपर्क साधून जखमींची विचारपूस करीत उपचाराबाबत योग्य त्या सूचना दिल्या आहेत. या घटनेने रावेर परिसरावर शोककळा पसरली आहे. द
सावदा येथील काही युवक भुसावळ येथे रेल्वे स्टेशनवर नातेवाईक यांना सोडून परत येत होते त्यांना हा अपघात घडल्याचे दिसताच त्यांनी लागलीच सावदा पोलीस स्टेशन मध्ये माहिती दिली व अपघातग्रस्त लोकांना मदत सुरू केली. त्यांनी अपघातग्रस्त युवकांना बाहेर काढले व उपचारार्थ दवाखान्यात रवाना केले. यात सावदा येथील संभाजी मित्र मंडळाचे मूर्तजा बोहरी, सोनू तांबटकर, साईराज वानखेडे, गौरव चौधरी, यांचे सह मित्रांनी तात्काळ मदत केली.
प्रत्यक्षदर्शीनुसार हा अपघात इतका भीषण होता कार झाडावर आदळल्यावर गाडी चक्काचूर झाली.