चोरीच्या पैशांवर खरेदी केला प्लॅट व दुचाकी : जळगावातील डॉक्टरांकडे चोरीनंतर मोलकरणीला बेड्या
जळगाव (30 डिसेंबर 2024) : डॉक्टरांकडे कामाला असलेल्या मोलकरणीनेच 20 लाखांच्या रोकडसह चार सोन्याचे बिस्किट लांबवल्याची घटना जळगावातील विवेकानंद नगरातील डॉ. प्रकाश चित्ते यांच्या हॉस्पीटलमध्ये घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर महिलेने या रकमेतून प्लॅटसह दोन दुचाकी खरेदी केल्याची बाब समोर आली. छाया संग्राम विसपुते असे अटकेतील महिलेचे नाव आहे.
असे आहे नेमके प्रकरण ?
विवेकानंद नगरात डॉ.प्रकाश चित्ते यांचे रुग्णालय असून वरच्या मजल्यावर ते कुटुंबीयांसह राहतात. त्यांच्या दुसर्या मजल्यावरील राहत्या घरात छायाबाई संग्राम विसपुते ही मोलकरीन असून तीने मे ते डिसेंबर अखेरच्या काळापर्यंत वेळोवेळी घरातून 20 लाख रुपयांची रोकड आणि चार लाख रुपयांचे सोन्याचे बिस्किट लांबवले. डॉ. चित्ते यांनी जिल्हापेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन संशयित मोलकरीन छाया विसपुते हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे हे करीत होते. त्यांनी शनिवारी महिलेला ताब्यात घेवून तिची चौकशी केली. यावेळी त्या महिलेने चोरी केल्याची कबुली दिल्यानंतर रविवारी सायंकाळच्या सुमारास संशयित छायाबाई विसपुतेला अटक करण्यात आली.
रोकडसह सोन्याचे बिस्कीट लांबवले
डॉक्टर चित्ते यांच्याकडे कामावर असलेल्या मोलकरणीला डॉक्टर दिवसभर रुग्णालयातून येणारे पैसे कुठे ठेवतात, याबाबतची संपूर्ण माहिती होती त्यामुळे ही मोलकरीण दोघे पती-पत्नी रुग्णालयात असतांना घरातील कपाटातून ठरावीक रक्कम काढून घेत होती. आठ महिन्यात या मोलकरणीने जवळपास 20 लाख रुपयांची रोकडसह 52 ग्रॅमचे सोन्याचे बिस्कीट चोरुन नेल्याचे पोलिस तक्रारीत नमूद आहे.


