पशूखाद्य विक्रीत जळगावातील महिला व्यापार्याला अडीच लाखांचा गंडा
जळगाव (1 जानेवारी 2025) : जळगावातील महिलेची पशूखाद्य विक्री प्रकरणात दोन लाख 34 हजारात फसवणूक झाली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले नेमके ?
पिंप्राळा येथील संत मिराबाई नगरात कांचन सुरेश येवले (38) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचा पशूखाद्य खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. संशयित आरोपी गोरख कैलास दुधरे (रा.गल्ले बोरगाव, ता.खुलताबाद, जि.छत्रपती संभाजीनगर) याने महिलेशी संपर्क साधून विश्वास संपादन करून सांगितले की, मला व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडून 170 पशूखाद्याच्या गोण्या तुमच्या कडील ट्रकमध्ये पाठवून देण्याचे सांगितले. त्यानुसार महिलेने विश्वास ठेवून दिलेल्या ऑर्डरप्रमाणे दोन लाख 34 हजार रूपये किंमतीच्या 170 पशूखाद्याच्या गोण्यांनी भरलेला ट्रक स्वत जावून त्यांनी पोहवून दिला.

संशयीताविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, दिलेल्या ऑर्डरप्रमाणे पैसे न देता महिला व्यापारी यांची फसवणूक केली. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सोमवारी 30 डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी गोरख कैलास दुधारे (रा.गल्ले बोरगाव, ता.खुलताबाद) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार विजय पाटील हे करीत आहे.









