महामार्गावर आजपासून हेल्मेट सक्ती : तर एक हजारांचा होणार दंड
जळगाव (3 फेब्रुवारी 2025) : वाढत्या अपघाताच्या घटनांना नियंत्रणात आणण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर सोमवार, 3 फेब्रुवारीपासून दुचाकीवर प्रवास करणार्या दोघांना हल्मेट वापराची सक्ती करण्यात आली आहे. महामार्गावर दुचाकी नेल्यास हेल्मेट ही आवश्यक बाब बनली आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास दुचाकी चालकाला जागेवरच एक हजार रुपयांचा दंड केला जाईल. वाहतूक पोलिसांचे पथक दुचाकीवर लक्ष ठेवून असणार आहेत.
तर होणार कारवाई
राष्ट्रीय महामार्गावर 2025 या वर्षात हेल्मेट सक्ती करण्याचा शासनाने निर्णय घेतला. दुचाकीवर हेल्मेट जिवासाठी किती सुरक्षित आणि महत्वपूर्ण आहे, याची जनजागृती पोलिसांकडून शाळा, महाविद्यालय तसेच लोकांमध्ये केली. गेल्या महिन्याभरापासून याबद्दल प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविले. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शाळा महाविद्यालय, खाजगी क्लासेस यांना पत्र देऊन हेल्मेटविषयी महत्व विषद करत पालकांना कळविण्याचे आवाहन केले होते. जानेवारी महिन्यात पोलिसांनी हेल्मेट संदर्भात क्शन घेतली नाही. मात्र याविषयी जनतेत मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्याला प्राधान्य दिले होते.


दोघांसाठी नियम बंधनकारक
सोमवार, 3 फेब्रुवारीपासून महामार्गावर दुचाकीवरील चालक तसेच मागे बसलेला स्वार अशा दोघांना हेल्मेट परिधान करावे लागेल. या सक्तीची अंमलबजावणी शहर पोलिसांतर्फे केली गेली आहे. महमार्गावर वाहतूक पोलीस दुचाकींवर लक्ष ठेवून असणार आहेत. आवश्यकता भासल्यास विना हेल्मेट दुचाकीस्वारांचे फोटो मोबाइलमध्ये कैद केले जातील. नागरिकांनी स्वत:साठी तसेच कुटुंबासाठी महमार्गावर दुचाकीवर हेल्मेटचा जरुर वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी केले आहे.






