होय, नागपूरातील दंगल पूर्व नियोजित : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूरसह राज्यभरात शांततेचे आवाहन : दंगलप्रकरणी 51 संशयीतांना अटक
नागपूर (19 मार्च 2025) : नागपूरातील दंगल पूर्वनियोजित होती, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला आहे.
विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा प्रयत्न करणार्यांवर जाती-धर्माचा विचार न करता कठोर कारवाई केली जाईल, जर कुणी पोलिसांवर हल्ला केला तर त्यालाही सोडणार नाही. दंगेखोरांवर कठोर कारवाई केली जाईल.’

काय घडले नागपूरात
औरंगजेबाच्या कबरीची प्रतिकृती जाळताना धर्मग्रंथातील मजकुराचेही दहन केल्याची अफवा पसरल्याने नागपुरात सोमवारी रात्री भीषण दंगल घडली. समाजकंटकांनी केलेल्या बेसुमार दगडफेक, जाळपोळीत तीन पोलिस उपायुक्तांसह 34 पोलिस कर्मचारी जखमी झाले. 50 ते 55 वाहने जाळण्यात आली. रात्री उशिरापासून ते मंगळवारी दिवसभर पोलिसांनी व्हायरल व्हिडिओची तपासणी करून दंगेखोरांना पकडण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन राबवले. यात 51 दंगेखोरांना अटक करून पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अजून 80 दंगेखोरांची ओळख पटली आहे.
स्थानिकांच्या मते, तोंडाला कपडा बांधून, हेल्मेट घालून हल्लेखोर आले होते. पेट्रोल बॉम्ब फेकून त्यांनी वाहने जाळली, हातात तलवारी घेऊन घरांवर हल्ले करत दहशत माजवली. पोलिसांनी सकाळपासून शहराच्या 11 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लावल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. दंगलग्रस्त भागातून मोठ्या प्रमाणावर दगडांचा साठा पथकाने जप्त केला.
दंगलीच्या वणव्यात नेत्यांनी ओतले तेल
समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी ‘औरंगजेब क्रूर नव्हता’ अशी मुक्ताफळे उधळली. यानंतर भाजप खासदार उदयनराजे भोसले, मंत्री नितेश राणे यांनी औरंगजेबाची कबर उखडून फेकण्याची भाषा केली. त्यामुळे हिंदू व मुस्लिम संघटना आक्रमक झाल्या. त्याचे पडसाद दंगलीपर्यंत उमटले. या घटनेचेही राजकारण करण्याचा प्रयत्न नेत्यांनी केला. विधिमंडळातही आरोप-प्रत्यारोप झाले. ‘जर नागपूरची दंगल पूर्वनियोजित होती असे मुख्यमंत्री सांगत असतील तर मग गुप्तचर यंत्रणा झोपली होती का?’ असा सवाल काँग्रेसने केला. ‘एक मंत्री सातत्याने चिथावणीखोर वक्तव्ये करत असल्याने परिस्थिती चिघळत आहे,’ असे विजय वडेट्टीवार म्हणाले. ही दंगल फडणवीस पुरस्कृत असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘उदात्तीकरण करणार्यांचा औरंगजेब नातलग आहे का?’ असा सवाल केला.
