खासदार संजय राऊतांचा दावा ; औरंगजेबाच्या कबरीचे प्रकरण उलटल्यानेच दिशा सालियन प्रकरण काढले
मुंबई (20 मार्च 2025) : खासदार संजय राऊत यांनी दिशा सालियन प्रकरणात मोठा दावा केला आहे. औरंगजेब कबरीचे प्रकरण त्यांनी बाहेर काढले मात्र तेच प्रकरण त्यांच्यावर उलटे शेकले गेले त्यामुळे दिशा सालियन प्रकरण पुन्हा काही लोकांनी बाहेर काढण्यात आले आहे. एखाद्या व्यक्तीच्या भविष्यावर असा चिखल उडवणे, ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे देखील राऊत यांनी म्हटले आहे.
ठाकरे कुटुंबाला आणि संपूर्ण शिवसेना परिवाराला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. औरंगजेब प्रकरण सरकारवर उलटले. औरंगजेबाला कबरीतून बाहेर काढून आमच्यावर सोडण्याचा प्रयत्न झाला मात्र तो त्यांच्यावरच उलटला त्यामुळे औरंगजेबापासून मुक्तता मिळवण्यासाठी हे प्रकरण गेल्या काही दिवसापासून शिजवले असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. यामागे कोणाची प्रेरणा आहे? कोणाची शक्ती आहे? आणि कोण पडद्यामागे हालचाली करत होते? याची सर्व माहिती आमच्याकडे असल्याचा दावा देखील त्यांनी केला.

अशा प्रकारचे राजकारण तुम्ही करणार असाल तर ते तुम्हाला लखलाभ असो. 300 साडेतीनशे ते 400 वर्षानंतर कबरीतून बाहेर काढण्यासाठी ज्या कबरी तुम्ही खोदत आहात, त्या कबरीत तुम्हालाच जावे लागेल. एखाद्या तरुण नेत्याच्या करिअरवर आणि भविष्यावर अशा प्रकारे चिखल उडवणारी महाराष्ट्राची संस्कृती नाही. आमच्यासारख्या अनेक नेत्यांवर हे प्रयोग झाले आहेत. त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. तरीदेखील तुमचे आयटी सेल आणि लीगल सेल काम करत आहेत मात्र कोणत्या थरापर्यंत जायचे हे महाराष्ट्राच्या राजकारण्यांनी ठरवायला हवे. भारतीय जनता पक्षाचे राज्य आल्यापासून आणि भाजपमध्ये काही बाडगे गेल्यापासून तसेच एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडल्यापासून त्यांच्याकडे असलेले अस्वस्थ आत्म्यांच्या हाताला काहीही लागलेले नाही. सत्ता आली तरी देखील ते अस्वस्थ आहे. त्यामुळे त्यांना अशा कारवाया सुचत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
