सकारात्मक वृत्तीनेही होतील आजार बरे ! : डॉ.गौरी खानापूरकर


Diseases can also be cured with a positive attitude! : Dr. Gauri Khanapurkar भुसावळ (4 ऑगस्ट 2025) :: प्रत्येक व्यक्तीस काही ना काही आजार विकार व असाध्य रोगही असतात पण निरोगी व्यक्ती आजार असूनही शारीरिक, मानसिक व आत्मिकदृष्टया सशक्त असतात. आपणास एखादे वेळेस काही लहान-मोठ्या आजारांची, विकारांची व रोगांची कुणकुण लागल्यास आपण तणावग्रस्त बनतो. त्या आजारांवर आपण आपले लक्ष केंद्रित करून, आपले काय होईल ? याची चिंता करतो त्यामुळे बरे होणारे आजार सुद्धा वाढीस लागतात. अशावेळी मानसिक ताण-तणाव न घेता, कुणकुण लागलेल्या, रोगाला, आजाराला व विकाराला सकारात्मक राहून आनंदाने स्वीकारा. त्यावर लक्ष केंद्रित करू नका. सकारात्मक राहिल्यास काही आजार सहजासहजी बरे होतात, असा आशावाद डॉ.गौरी खानापूरकर यांनी येथे व्यक्त केला.

शहरातील श्री जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघ, सुरभी नगराची साप्ताहिक सभा श्री गणपती मंदिरात सायंकाळी पाच वाजता संघाचे उपाध्यक्ष एन.जे.वडतकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. श्री गणेश मूर्ती व स्व. अरुण मांडळकर सर यांच्या प्रतिमेस प्रमुख अतिथींच्या हस्ते माल्यार्पणाने व श्री गणपती स्तोत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख अतिथींचा परिचय संघाचे सल्लागार दिनकर जावळे यांनी दिला.


‘आरोग्य संपदा’ म्हणून लक्ष देणे गरजेचे
डॉ.खानापूरकर यांनी ‘वृद्धांची आरोग्य संपदा’ याविषयी सूक्ष्म बाबींवर अतिउत्कृष्ट मार्गदर्शन केले. जगामध्ये अनेक व्यक्तींनी शारीरिक अपंगत्व व अनेक रोगांनी ग्रस्त असून सुद्धा रोगांकडे दुर्लक्ष करून गिर्यारोहण, मॅरेथॉन शर्यत व विविध स्पर्धांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग, असे यश प्राप्त केलेले आहे. सुप्रसिद्ध अभिनेते अभिताभ बच्चन वयोवृद्ध व अनेक विकारग्रस्त असून सुद्धा त्यांचे व्यक्तिमत्व निरंतर प्रसन्न आहे. आहार-विहार व विचार यांच्याकडे सुद्धा आपली ‘आरोग्य संपदा’ म्हणून लक्ष देणे गरजेचे आहे. आपला आहार संतुलित असावा .भोजन थाळी मध्ये रंगीत पदार्थ असावेत. जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात. शरीरास आवश्यक एवढेच भोजन करावे, फळे जेवणाआधी खावीत, आपणास जेवणातून ऊर्जा मिळते, चयापचय क्रियेत बिघाड होणार नाही याची काळजी घ्यावी.

दररोज किमान सहा ते दहा हजार पावले चालले पाहिजेत. टप्प्यानुसार चालतांना 2-2-5-5 मिनिटांचे गट पाडून हळू चालणे, गतीत वाढ, समान गतीने चालणे, परत हळू चालणे, असा क्रम ठेवल्यास हृदयाच्या ठोक्यांचं संनियंत्रण होते. आपली क्षमता पाहून व्यायाम, योगा व प्राणायाम करा. कुटुंबातील व्यक्तींशी सुसंवाद साधा. मित्रांच्या समूहात राहा. आनंदात रहा. निरोगी रहा. सर्वांना निरामय आरोग्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात.

अध्यक्ष एन.जे.वडतकर यांनी मनोगत व्यक्त केले. महिला सल्लागार जयश्री ढाके यांनी आभार मानले. सूत्रसंचालन संघ सचिव दिलीप तिडके यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सभासद यांनी अनमोल सहकार्य केले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !