भुसावळात बलबलकाशी नाल्यात खडी, वाळूचे रॅबीट टाकल्याने प्रवाहात अडथळे
भुसावळ पालिका प्रशासनाकडे तक्रारीनंतरही कारवाई शून्य
In Bhusawal, gravel and sand rabbits are thrown into the drain with force, causing obstructions in the flow भुसावळ (5 ऑगस्ट 2025) : शहरात पालिकेने नुकतीच नालेसफाई सुरू केली मात्र जामनेर रोडवरील पांडूरंग टॉकीज परिसरातील बलबलकाशी नाल्यातील सफाईचे काम पूर्ण झाले मात्र या मार्गावर दगडी पूलाकडे जाणार्या मार्गावर बांधकाम साहित्य व वाळू विक्रीची दुकाने आहेत. वाळू गाळल्यानंतर उर्वरित खडी व रॅबीट हे व्यावसायीक थेट नाल्यात टाकत असल्याची बाब समोर आली आहे. प्रशासन मात्र या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करीत आहे.
काय घडले भुसावळात
जामनेर रोडवरुन दगडी बोगद्याकडे जाणार्या नाल्याच्या काठावर वाळू व बांधकाम साहित्य विक्रीची दुकाने आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी वाळूचीही विक्री होते. वाळू गाळल्यानंतर उर्वरित रॅबीटची विल्हेवाट न लावता ते थेट लागूनच असलेल्या नाल्यात टाकले जाते. पालिकेने नालेसफाईची निविदा यंदा तब्बल चार हजार रुपये टन प्रमाणे नाल्यातील कचरा काढण्याचे काम दिले आहे.

नाल्यांमध्ये वाळू किंवा वाळूच्या खडीसारख्या अवजड वस्तू टाकल्यास त्या स्वच्छ करण्यासाठी पालिकेला नाहक अतिरिक्त रक्कम ठेकेदाराला अदा करावी लागते. यामुळे नाल्यांमध्ये खडी, रॅबीट, विटांचे टाकाऊ अवशेष टाकणे चूकीचे आहे. असे असतानाही या ठिकाणी वाळू विक्रेते स्वत: व्यवसाय करुन भुर्दंड मात्र पालिका प्रशासनाला देत आहेत. या प्रकरणी अनेक नागरिकांनी पालिकेच्या जबाबदार अधिकार्यांकडे तोंडी तक्रारी केल्या, मात्र प्रशासनाकडून नेहमीप्रमाणे दखल घेतली गेली नाही. नाल्यांमध्ये नैसर्गिक प्रवाहास अडथळे निर्माण होणे तसेच अस्वच्छता करणार्यांविरुध्द पालिकेने कारवाई केल्यास हे प्रकार थांबू शकतील. मात्र प्रशासनाचीही मानसिकता किंवा कर्तव्यदक्षता नसल्याने हे प्रकार सुरुच आहेत.
नाल्यांमध्ये टाकाऊ पदार्थ
शहरातील मुख्य बाजारपेठेतून नाला वाहतो. यात अनेक दुकानदार नाल्यांमध्ये कचरा टाकतात. बाजारपेठेत दिवभरातून दोनवेळा घंटागाडी येते, तरी नाल्यांमध्ये कचरा का टाकला जातो? असा प्रश्न आहे. यासोबतच मांस विक्री करणारे विक्रेतेही टाकाऊ पदार्थ थेट नाल्यात टाकतात. यामुळे दुर्गंधी वाढत आहे.




