मंत्री झिरवाळांना क्लीन चीट ! खासदार संजय राऊत यांचा धक्कादायक आरोप


मुंबई (23 फेब्रुवारी 2026) : महाराष्ट्रातील मंत्रालयात सध्या प्रत्येक मंत्र्याच्या दालनात धाड टाकावी, इतका भ्रष्टाचार बोकाळला आहे, असा घणाघाती आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टीकेलाही आपल्या खास ‘शैली’त प्रत्युत्तर दिले. अन्न आणि औषध प्रशासन विभागातील कर्मचारी राजू ढेरिंगे याला लाच घेताना रंगेहात पकडल्याच्या घटनेनंतर अडचणीत आलेले मंत्री नरहरी झिरवाळ यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन चिट दिल्यावर खासदार राऊत यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.

काय म्हणाले संजय राऊत?
नरहरी झिरवाळ प्रकरणानंतर मी सामना अग्रलेखात भूमिका मांडलेली आहे की, देवेंद्र फडणवीस मंत्र्यांवर कारवाया करतात, धाडी घालतात आणि मग त्या मंत्र्याला क्लीन चीट देत, त्या मंत्र्याची शेंडी आपल्या हातात ठेवतात तसेच फडणवीसांनी आता सुनेत्रा पवारांच्या एका मंत्र्याची शेंडी आपल्या हातात ठेवली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

प्रत्येक मंत्र्यांच्या दालनात भ्रष्टाचार
मंत्र्याच्या कार्यालयात लाचलुचपतची कारवाई होते. पोलिस मंत्रालयात घुसतात परंतु त्या मंत्र्यावर कारवाई न करता, त्याला उघडपणे क्लीन चीट देता. ही त्यांची भ्रष्टाचाराविषयीची भूमिका आहे. भ्रष्टाचार करा पण तुमची शेंडी माझ्या हातात राहू द्या. त्यामुळे फडणवीस हे भ्रष्टाचाराच्या बाबतीत अत्यंत ढोंगी आहेत. महाराष्ट्रातील मंत्रालयात प्रत्येक मंत्र्यांच्या दालनात धाडी घालाव्यात इतका भ्रष्टाचार आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.

ठाकरेंनी विधीमंडळात जावे ही आमची इच्छा
उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळात परत जावे, ही आमच्या सर्वांची इच्छा आहे. पण त्यांची इच्छा काय आहे? याची आम्हाला चाचपणी करावी लागेल तसेच शरद पवार किंवा काँग्रेस संदर्भात त्यांच्या हायकमांडची काय भूमिका आहे? हे जेव्हा आम्ही तिघे एकत्र बसू, तेव्हा त्यातून निर्णय मिळेल, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !