पायलट ‘सुसाईड बॉम्बर’ होता का? : आमदार अमोल मिटकरींचा खळबळजनक सवाल
Was the pilot a ‘suicide bomber’?: Sensational question from MLA Amol Mitkari अकोला (23 फेब्रुवारी 2026) : ज्याप्रमाणे ’लिट्टे’ने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या केली तसाच प्रकार इथे घडला आहे का? पायलट सुमित कपूर हा ‘सुसाईड बॉम्बर’ म्हणून विमानात आला होता का? असा खळबळजनक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला. या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
विमान अपघाताबाबत शंका
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ विमान अपघातात निधन झाले. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी तीन पत्रकार परिषदा घेत अनेक प्रश्न उपस्थित करणारे सादरीकरणही त्यांनी केले होते. आता अमोल मिटकरी यांनी अजित पवारांची ‘राजीव गांधी’ यांच्याप्रमाणे हत्या झालीये का? पायलट ‘सुसाईड बॉम्बर’ होता का? असे प्रश्न विचारत शंका उपस्थित केल्या आहेत.

काय म्हणाले अमोल मिटकरी?
अकोला जिल्ह्यातील पारस फाटा येथे आयोजित शिवजयंती कार्यक्रमात बोलताना मिटकरी यांनी अनेक तांत्रिक प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, जो वैमानिक होता कपूर त्याची ड्रंकची हिस्ट्री होती. हा वैमानिक सुसाईड बॉम्बर म्हणून आला होता का? राजीव गांधींच्या वेळी जसे एक मुलगी सुसाईड बॉम्बर म्हणून आली होती. तसाच हा सुसाईड बॉम्बर म्हणून कपूर आला नसेल ना? जर पायलट सुमित कपूरची पत्नी तो जिवंत असल्याचे सांगत असेल, तर अपघातात नक्की कोणाचा मृत्यू झाला? या विमान अपघाताबाबत एवढे मोठे गूढ असताना संपूर्ण महाराष्ट्र इतका शांत कसा असू शकतो?
‘त्या’ दोन कॅप्टन्सचे सीसीटीव्ही कुठे आहेत?
अजित पवारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना मिटकरींनी आधीच्या वैमानिकांचा उल्लेख केला. नेहमी अजितदादांसोबत असणारे कॅप्टन साहिल मदन आणि कॅप्टन यश हे नेमक्या कोणत्या ट्रॅफिकमध्ये अडकले ? सध्या कुठे आहेत ते? ते आहेत आणि त्यांचे सीसीटीव्ही फुटेज का समोर आणले जात नाहीत? गोजूबावीच्या माळरानावर घडलेला हा प्रसंग म्हणजे न उलगडलेले गूढ आहे, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. ‘ब्लॅक बॉक्स’चा डेटा आणि विमानतळाचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करण्यास शासन का घाबरत आहे? असा सवालही त्यांनी केला.