उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा हादरा : उन्मेष पाटील शिंदे गटाच्या वाटेवर !
Big shock to Uddhav Thackeray’s group: Unmesh Patil on the way to Shinde group! चाळीसगाव (3 मार्च 2026) : चाळीसगावचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून येत्या शुक्रवार, 6 मार्च रोजी मुंबईत शक्तीप्रदर्शन करत ते अधिकृतपणे शिंदे गटात सामील होणार असल्याची माहिती आहे. पाटील यांच्या शिंदे गटात जाण्यामुळे आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
राजकीय समीकरणे बदलणार !
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर अनेक आमदार, जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष शिंदे गटात दाखल झाले. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या राजकीय हालचाली अजूनही थांबलेल्या नाहीत. निवडणुका नसतानाही काही नेते शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. त्यात आता उन्मेष पाटील यांच्या नावाची भर पडली आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे जळगाव आणि चाळीसगाव परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



6 मार्च रोजी होणार अधिकृत प्रवेश
उन्मेष पाटील यांच्या मालमत्तेवर छत्रपती संभाजीनगर येथील एका सहकारी बँकेकडून थकीत कर्जापोटी जप्तीची कारवाई सुरू झाल्यानंतर त्यांनी भूमिका बदलल्याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा शिंदे सेनेत प्रवेश होणार असल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क लावले जात आहेत. 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर लोकसभेत निवडून आलेल्या पाटील यांना 2024 मध्ये उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी चाळीसगाव मतदारसंघातून निवडणूक लढवली; मात्र त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांच्या राजकीय हालचाली कमी झाल्याचे दिसत होते. गेल्या महिन्यात त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेत प्राथमिक चर्चा केली होती. आता 6 मार्च रोजी त्यांच्या उपस्थितीत अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे.
शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांची भूमिका काय ?
या प्रवेश सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे चाळीसगावसह जळगाव जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे. शिंदे गट अधिक मजबूत होईल का, की स्थानिक पातळीवर गट-तट निर्माण होतील, याबाबत चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे फायरब्रँड नेते गुलाबराव पाटील यांची भूमिका काय असेल, याकडेही लक्ष लागले आहे. तसेच मित्रपक्ष भाजप आणि चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची प्रतिक्रिया काय असेल, याची उत्सुकता आहे.
एकूणच, उन्मेष पाटील यांच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकीय धुळवड पुन्हा एकदा रंगली आहे. ठाकरे गटाला बसलेला हा धक्का कितपत मोठा ठरेल आणि शिंदे सेनेला याचा किती फायदा होईल, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे मात्र 6 मार्चचा पक्षप्रवेश सोहळा जळगाव जिल्ह्यातील राजकारणासाठी निर्णायक ठरणार, हे निश्चित मानले जात आहे.







